Scrap the stringent conditions : राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेतील जाचक अटी तात्काळ रद्द करून सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) यांनी केली आहे. या मागणीसाठी बाळापूर तहसीलदार वैभव फरतारे यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले.

‘शेतकऱ्यांवर अन्याय सहन करणार नाही’; कर्जमाफी योजनेविरोधात राष्ट्रवादीचे निवेदन
ज़ाकिर अहमद शेख
बाळापूर : राज्य शासनाने जाहीर केलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेतील जाचक अटी तात्काळ रद्द करून सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) यांनी केली आहे. या मागणीसाठी बाळापूर तहसीलदार वैभव फरतारे यांच्यामार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन सादर करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे बाळापूर तालुकाध्यक्ष शिवाजी म्हैसने यांच्या नेतृत्वाखाली हे निवेदन देण्यात आले. निवेदनात राज्य शासनाच्या नव्या कर्जमाफी योजनेतील अटींवर तीव्र आक्षेप नोंदविण्यात आला आहे.
निवेदनानुसार, शासनाने २०१९ ते २०२६ या कालावधीत घेतलेल्या अल्पमुदतीच्या पीककर्जासाठी दोन लाख रुपयांपर्यंत कर्जमाफी जाहीर केली असली, तरी २०१९ मधील महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना केवळ ५० हजार रुपयांपर्यंतच लाभ देण्याची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे २०१९ मध्ये कर्जमाफीचा लाभ घेतलेल्या सुमारे ३३ लाख शेतकऱ्यांना नव्या योजनेचा संपूर्ण लाभ मिळणार नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तसेच दोन लाख रुपयांपेक्षा अधिक कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी लागू करण्यात आलेल्या एकवेळ समझोता योजनेवरही राष्ट्रवादी काँग्रेसने टीका केली आहे. अतिरिक्त रक्कम भरल्यानंतरच कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याची अट शेतकरीविरोधी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
प्रोत्साहनपर अनुदानासाठी घालण्यात आलेल्या अटींबाबतही पक्षाने नाराजी व्यक्त केली आहे. २०२२-२३, २०२३-२४ आणि २०२४-२५ या वर्षांपैकी कोणत्याही दोन वर्षांचे कर्ज नियमित फेडलेले असावे, तसेच २०२५-२६ आणि २०२६-२७ या वर्षांचे पीककर्जही भरलेले असावे, अशी अट घालण्यात आली आहे. परिणामी शेतकऱ्यांना चार वर्षांचे कर्ज फेडल्यानंतरच अनुदानाचा लाभ मिळणार असल्याने अनेक शेतकरी या योजनेपासून वंचित राहण्याची शक्यता असल्याचे निवेदनात म्हटले आहे. शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत असताना शासनाने कर्जमाफी योजनेतील सर्व जाचक अटी रद्द करून सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसने केली आहे.यावेळी निसार भाई, अनंता बुले, अकिल ठेकेदार, गोपाल धुमाळे, पुरुषोत्तम कराळे, गजानन वाकळे, मंगेश मांगटे, अनंता बोरसे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

