Raid on shop in Kothali : अन्न व औषध प्रशासन विभागाने मोताळा तालुक्यातील ईब्राहिमपूर (कोथळी) येथे धाड टाकून प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला. या प्रकरणी बोराखेडी पोलीस ठाण्यात दोन भावांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अन्न व औषध प्रशासन विभागाची धडक कारवाई
मोताळा : अन्न व औषध प्रशासन विभागाने मोताळा तालुक्यातील ईब्राहिमपूर (कोथळी) येथे धाड टाकून प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त केला. या प्रकरणी बोराखेडी पोलीस ठाण्यात दोन भावांविरुद्ध अन्न सुरक्षा व मानके अधिनियम तसेच भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन्न सुरक्षा अधिकारी नितीन महादेवराव नवलकार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बोराखेडी पोलीस ठाण्यात कायमस्वरूपी गुन्हा क्रमांक ३०९/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपी राहुल संजय लाटे (वय २४) व अमोल उर्फ विठ्ठल संजय लाटे (वय २७, दोघेही रा. मेन रोड, हनुमान मंदिराजवळ, ईब्राहिमपूर, ता. मोताळा) अशी आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, १६ जून रोजी दुपारी १ ते ३ वाजेदरम्यान अन्न सुरक्षा व औषध प्रशासन विभागाच्या पथकाने पंचांसमक्ष छापा टाकला. या कारवाईत विविध कंपन्यांच्या प्रतिबंधित पानमसाला, जर्दा आणि तंबाखूजन्य पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला. यामध्ये पान बहार पानमसाला, नजर-१००० पानमसाला, विविध प्रकारचा तंबाखू तसेच जाफरानी जर्दा यांचा समावेश आहे. तपासादरम्यान आरोपी राहुल लाटे याच्या सांगण्यावरून विमल कंपनीच्या पानमसाल्याच्या विक्रीसाठी वापरण्यात येणारी १,२३० स्क्रॅच कार्ड तसेच रॉयल ब्लेंडेड बीआर गोल्ड पानमसाल्यासाठी वापरण्यात येणारी ६० स्क्रॅच कार्डही जप्त करण्यात आली. एकूण १,२९० स्क्रॅच कार्ड पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.
कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेल्या प्रतिबंधित अन्नपदार्थांची किंमत ५१२ रुपये असल्याचे नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्रात गुटखा, पानमसाला आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी असताना त्यांचा साठा व विक्री केल्याप्रकरणी आरोपींवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियम २००६ तसेच भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल श्रीकांत चिटवार करीत असून अन्न व औषध प्रशासन आणि बोराखेडी पोलिसांकडून अधिक चौकशी सुरू आहे.

