Mahabreaking

[breaking_news]

Shops in Sakharkherda :आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धास्तीने साखरखेर्ड्यात दुसऱ्यांदा दुकाने बंद

Shops in Sakharkherda : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईच्या चर्चेमुळे साखरखेर्डा येथे व्यापाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली. अन्न व औषध प्रशासनाचे पथक गावात येणार असल्याची अफवा पसरताच पानटपऱ्या, किराणा दुकाने आणि काही हॉटेल व्यावसायिकांनी आपली दुकाने घाईघाईने बंद केली. विशेष म्हणजे अशा प्रकारची घटना अल्पावधीत दुसऱ्यांदा घडल्याने व्यापारी वर्गात प्रशासनाच्या कारवाईची धास्ती निर्माण झाल्याचे दिसून आले.

Shops in Sakharkherda

अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाची अफवा; पानटपऱ्या, हॉटेल्स आणि किराणा दुकाने झटपट बंद

साखरखेर्डा : अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या धडक कारवाईच्या चर्चेमुळे साखरखेर्डा येथे व्यापाऱ्यांमध्ये पुन्हा एकदा खळबळ उडाली. अन्न व औषध प्रशासनाचे पथक गावात येणार असल्याची अफवा पसरताच पानटपऱ्या, किराणा दुकाने आणि काही हॉटेल व्यावसायिकांनी आपली दुकाने घाईघाईने बंद केली. विशेष म्हणजे अशा प्रकारची घटना अल्पावधीत दुसऱ्यांदा घडल्याने व्यापारी वर्गात प्रशासनाच्या कारवाईची धास्ती निर्माण झाल्याचे दिसून आले.

यापूर्वी रविवारी सायंकाळीही अशाच प्रकारची चर्चा पसरल्यानंतर अनेक किराणा दुकाने, पानटपऱ्या आणि हॉटेल्स बंद करण्यात आली होती. मात्र नंतर ती केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर मंगळवारी (१६ जून) दुपारी पुन्हा अन्न व औषध प्रशासनाचे पथक गावात दाखल होणार असल्याची चर्चा सुरू झाली आणि काही वेळातच अनेक दुकाने बंद करण्यात आली.

या अचानक झालेल्या दुकानबंदीमुळे ग्राहकांची मोठी गैरसोय झाली. दैनंदिन गरजांच्या वस्तू खरेदीसाठी आलेल्या नागरिकांना रिकाम्या हाताने परत जावे लागले. दुपारनंतर ही केवळ अफवा असल्याचे स्पष्ट झाल्यावर बहुतांश दुकाने पुन्हा सुरू झाली.

दरम्यान, काही व्यावसायिकांनी मात्र कोणतीही घाई न करता आपली दुकाने सुरू ठेवली. प्रशासनाचे अधिकारी प्रत्यक्ष येतील तेव्हा परिस्थितीला सामोरे जाऊ, अशी भूमिका त्यांनी घेतल्याचे दिसून आले.

स्थानिक पातळीवर गुटखा आणि प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीबाबत सातत्याने चर्चा होत असते. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाच्या संभाव्य कारवाईच्या चर्चेने व्यापारी वर्ग अधिक सतर्क झाल्याचे चित्र दिसून आले.

अलीकडील काळात आयुक्त तुकाराम मुंढे यांनी राज्यभर अन्न भेसळ, गुटखा विक्री आणि नियमभंग करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतल्याने संबंधित विभाग अधिक सक्रिय झाल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. त्यामुळे प्रशासनाचे पथक येणार असल्याची केवळ चर्चा जरी पसरली तरी अनेक व्यापारी तातडीने दुकाने बंद करण्याचा निर्णय घेत असल्याचे साखरखेर्ड्यातील या घटनेतून दिसून आले.

या संपूर्ण प्रकाराची दिवसभर परिसरात चर्चा रंगली असून, प्रशासनाच्या कारवाईपेक्षा अफवांनीच व्यापारी वर्गात अधिक धास्ती निर्माण केल्याचे चित्र पाहायला मिळाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top