Delayed rains : एल निनोच्या प्रभावामुळे जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही. जून महिना अर्धा संपत आला असला तरी पावसाची प्रतीक्षाच असल्याने पेरण्याही खोळंबल्या आहेत. दुसरीकडे जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठ्याची सद्यस्थिती चिंताजनक बनली असून काही मोजक्या प्रकल्पांवरच जिल्ह्याची पाण्याची गरज अवलंबून असल्याचे चित्र समोर आले आहे. विशेषतः खडकपूर्णा प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा पूर्णपणे संपुष्टात आल्याने आगामी काळातील पाणीपुरवठ्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

१३ प्रकल्प कोरडे; पेरण्याही खोळंबल्या, जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट, पाणीटंचाईची तीव्रता वाढली
गजानन तिडके
बुलढाणा : एल निनोच्या प्रभावामुळे जिल्ह्यात अद्यापही दमदार पाऊस झालेला नाही. जून महिना अर्धा संपत आला असला तरी पावसाची प्रतीक्षाच असल्याने पेरण्याही खोळंबल्या आहेत. दुसरीकडे जिल्ह्यातील धरणांमधील जलसाठ्याची सद्यस्थिती चिंताजनक बनली असून काही मोजक्या प्रकल्पांवरच जिल्ह्याची पाण्याची गरज अवलंबून असल्याचे चित्र समोर आले आहे. विशेषतः खडकपूर्णा प्रकल्पातील उपयुक्त जलसाठा पूर्णपणे संपुष्टात आल्याने आगामी काळातील पाणीपुरवठ्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
जिल्ह्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये पेनटाकळी धरण सध्या दिलासादायक स्थितीत असून ५९.९७ दशलक्ष घनमीटर क्षमतेपैकी २२.१४ दशलक्ष घनमीटर म्हणजे ३६.९३ टक्के साठा उपलब्ध आहे. नळगंगा धरणात ३९.३८ टक्के साठा असून जिल्ह्यासाठी तेही महत्त्वाचा आधार ठरत आहे. मात्र खडकपूर्णा धरणातील उपयुक्त साठा शून्यावर पोहोचल्याने इतर जलस्रोतांवरील ताण वाढण्याची शक्यता आहे.
मध्यम प्रकल्पांमध्ये ज्ञानगंगा धरणाची स्थिती तुलनेने चांगली असून कोराडी धरणात ४०.६१ टक्के साठा उपलब्ध आहे. मसा प्रकल्पात २९.४५ टक्के तर मन प्रकल्पात २४.७४ टक्के साठा आहे. दुसरीकडे पलढग प्रकल्पात केवळ ०.१७ दशलक्ष घनमीटर म्हणजे २.२६ टक्के साठा शिल्लक राहिल्याने हा प्रकल्प धोक्याच्या टप्प्यावर पोहोचला आहे.
काही प्रकल्पांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत सुधारणा दिसून येत असली तरी बहुतांश मध्यम आणि लघु प्रकल्पांतील घटता साठा प्रशासनासमोर मोठे आव्हान निर्माण करत आहे. कोराडी धरणात गतवर्षी २२.२२ टक्के साठा होता, तो यंदा ४०.६१ टक्क्यांपर्यंत वाढला आहे. मात्र उतावळीमध्ये २१.६८ टक्के, तोरणामध्ये १४.०७ टक्के आणि पलढगमध्ये केवळ २.२६ टक्के साठा उरल्याने परिस्थिती गंभीर बनली आहे.
दरम्यान, जिल्ह्यातील तब्बल १३ प्रकल्पांमधील अत्यल्प जलसाठ्यामुळे पावसाने लवकर हजेरी लावली नाही तर पिण्याच्या पाण्यासह सिंचन व्यवस्थेवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे प्रशासन आणि नागरिकांचे लक्ष आता आगामी पावसाकडे लागले आहे.

