Bugle sounded : अकोला पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्वात मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या बोरगाव मंजू ग्रामपंचायतीच्या २०२६ च्या सार्वत्रिक निवडणुकीचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाल्याने गावातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. आरक्षण जाहीर होताच इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना वेग आला असून काहींच्या आशा पल्लवित झाल्या तर काहींचा हिरमोड झाल्याचे चित्र आहे.

सरपंचपद एसटीसाठी राखीव; इच्छुकांचा हिरमोड, नव्या चेहऱ्यांच्या शोधाला सुरुवात
संजय तायडे
बोरगाव मंजू : अकोला पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सर्वात मोठ्या ग्रामपंचायतींपैकी एक असलेल्या बोरगाव मंजू ग्रामपंचायतीच्या २०२६ च्या सार्वत्रिक निवडणुकीचे प्रभागनिहाय आरक्षण जाहीर झाल्याने गावातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. आरक्षण जाहीर होताच इच्छुक उमेदवारांच्या हालचालींना वेग आला असून काहींच्या आशा पल्लवित झाल्या तर काहींचा हिरमोड झाल्याचे चित्र आहे.
बोरगाव मंजू ग्रामपंचायतीत एकूण १७ सदस्यांच्या जागांसाठी सहा प्रभागांमधून निवडणूक होणार आहे. ग्रामपंचायतीची मोठी सदस्यसंख्या आणि स्थानिक राजकीय प्रभाव लक्षात घेता ही निवडणूक आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांची रंगीत तालीम मानली जात आहे. जरी ग्रामपंचायत निवडणुका पक्षचिन्हावर होत नसल्या तरी गावपातळीवरील विविध राजकीय पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते या निवडणुकीकडे अत्यंत गांभीर्याने पाहत आहेत.
यावेळी सरपंचपद अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. त्यामुळे सरपंचपदासाठी इच्छुक असलेल्या अनेक पारंपरिक दावेदारांचे राजकीय गणित बिघडले आहे. मागील पंचवार्षिक निवडणुकीत सरपंचपद ओबीसी महिला प्रवर्गासाठी राखीव होते. त्यामुळे महिला नेतृत्वाला संधी मिळाली होती. मात्र यंदाच्या आरक्षणामुळे गावातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीत स्थानिक पातळीवर पॅनल पद्धतीने लढती होत असल्याने विविध गटांनी आपापली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. सक्षम उमेदवारांची चाचपणी, प्रभागनिहाय सामाजिक समीकरणांचा अभ्यास आणि मतदारसंघातील प्रभावी कार्यकर्त्यांना एकत्र करण्यासाठी राजकीय नेते सक्रिय झाले आहेत.
गत निवडणुकीत गावातील चार प्रमुख पॅनल आणि अपक्ष उमेदवारांसह तब्बल ६७ उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले होते. त्यामुळे यंदाही बहुरंगी लढत होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः सरपंचपद आणि सर्वाधिक सदस्यसंख्या कोणत्या गटाच्या ताब्यात जाते, यावर गावातील पुढील राजकीय नेतृत्वाची दिशा ठरणार असल्याची चर्चा आहे.
प्रभागनिहाय आरक्षण असे :
प्रभाग क्र. १ : ओबीसी महिला – १, ओबीसी – १, सर्वसाधारण महिला – १ (एकूण ३)
प्रभाग क्र. २ : ओबीसी – १, सर्वसाधारण महिला – १, सर्वसाधारण – १ (एकूण ३)
प्रभाग क्र. ३ : अनुसूचित जाती महिला – १, ओबीसी – १, सर्वसाधारण महिला – १ (एकूण ३)
प्रभाग क्र. ४ : अनुसूचित जाती – १, सर्वसाधारण महिला – १ (एकूण २)
प्रभाग क्र. ५ : अनुसूचित जाती महिला – १, सर्वसाधारण महिला – १, सर्वसाधारण – १ (एकूण ३)
प्रभाग क्र. ६ : अनुसूचित जाती – १, ओबीसी महिला – १, सर्वसाधारण – १ (एकूण ३)
एकूण आरक्षणाचे चित्र :
अनुसूचित जाती : ४ जागा (महिला २, सर्वसाधारण २)
ओबीसी : ४ जागा (महिला २, सर्वसाधारण २)
खुला प्रवर्ग : ९ जागा (महिला ५, सर्वसाधारण ४)
एकूण १७ सदस्यांपैकी ९ जागा महिलांसाठी राखीव असून ८ जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आहेत.
आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता गावातील विविध गटांकडून राजकीय मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. आगामी काळात उमेदवारी, पॅनल निर्मिती आणि गटबाजीच्या घडामोडींना वेग येणार असून बोरगाव मंजू ग्रामपंचायत निवडणूक तालुक्यातील सर्वाधिक चर्चेची निवडणूक ठरण्याची चिन्हे आहेत.

