Brutal murder : पातुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कारला शिवारात असलेल्या सुधाकरराव नाईक आश्रमशाळेच्या प्रवेशद्वारासमोर रविवारी पहाटे एका १७ वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यश गजानन गिरे असे मृत युवकाचे नाव असून, या घटनेमुळे आलेगावसह परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.

आश्रमशाळेसमोर रक्तरंजित हत्याकांड; ‘हद्दीच्या वादात’ पोलिसांवर नागरिकांचा संताप
निशांत गवई
पातूर : पातुर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कारला शिवारात असलेल्या सुधाकरराव नाईक आश्रमशाळेच्या प्रवेशद्वारासमोर रविवारी पहाटे एका १७ वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यश गजानन गिरे असे मृत युवकाचे नाव असून, या घटनेमुळे आलेगावसह परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, तीन अज्ञात युवकांनी यश गिरे याच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. ही घटना रविवारी पहाटे अंदाजे ५ ते ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. हल्ल्यानंतर गंभीर जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या यशला काही नागरिकांनी तातडीने आलेगाव येथील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (जीएमसी) हलविण्याचा सल्ला दिला. दुर्दैवाने उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
या घटनेमुळे आलेगाव परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या चार ते पाच वर्षांत परिसरातील तरुणाचा खून होण्याची ही दुसरी घटना असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सतत घडणाऱ्या गंभीर गुन्ह्यांमुळे पोलिसांचा धाक कमी झाला आहे का, असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
दरम्यान, या प्रकरणात पोलिसांच्या कार्यपद्धतीवरही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. ज्या ठिकाणी हत्या झाली ते घटनास्थळ पातुर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याचे सांगितले जात असताना, घटनेची माहिती मिळाल्यानंतर चानी पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी प्रथम दाखल झाल्याची चर्चा आहे. तर पातुर पोलिसांकडून सुरुवातीला हद्दीबाबत संभ्रम व्यक्त करण्यात आल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या कथित टोलवाटोलवीमुळे महत्त्वाचा वेळ वाया गेल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे.
घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी पोलिसांच्या भूमिकेबाबत नाराजी व्यक्त करत, गुन्हेगारी रोखण्यासाठी अधिक प्रभावी उपाययोजना करण्याची मागणी केली. युवकाच्या हत्येमुळे परिसरातील कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावरही चर्चा सुरू झाली आहे.
घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन पडघन, चानी पोलीस ठाण्याचे अधिकारी तसेच पातुर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आला असून, पातुर पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी विशेष पथके रवाना केली असून, हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. संशयितांना तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. या घटनेमुळे आलेगाव परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे.

