Mahabreaking

[breaking_news]

Pravin Janjal :संसाराचे स्वप्न अधुरे राहिले, पण देशसेवेचा मान उंचावला; शहीद प्रवीण जंजाळ यांचा गौरव

Pravin Janjal : भारत मातेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या मोरगाव (भाकरे) येथील शूर जवान प्रवीण प्रभाकर जंजाळ यांना केंद्र सरकारने मरणोत्तर कीर्तीचक्र या देशातील सर्वोच्च शौर्य सन्मानांपैकी एकाने गौरविले आहे. या घोषणेनंतर संपूर्ण अकोला जिल्ह्यासह परिसरात अभिमानाची भावना व्यक्त होत असतानाच जंजाळ कुटुंबीयांच्या डोळ्यांत पुन्हा एकदा आठवणींचे अश्रू दाटून आले.

Pravin Janjal

 वीरपत्नीच्या डोळ्यांत अश्रू, हृदयात अभिमान; शहीद प्रवीण जंजाळ यांना सर्वोच्च शौर्य सन्मान

 

अकोला : भारत मातेच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या मोरगाव (भाकरे) येथील शूर जवान प्रवीण प्रभाकर जंजाळ यांना केंद्र सरकारने मरणोत्तर कीर्तीचक्र या देशातील सर्वोच्च शौर्य सन्मानांपैकी एकाने गौरविले आहे. या घोषणेनंतर संपूर्ण अकोला जिल्ह्यासह परिसरात अभिमानाची भावना व्यक्त होत असतानाच जंजाळ कुटुंबीयांच्या डोळ्यांत पुन्हा एकदा आठवणींचे अश्रू दाटून आले.

अकोला जिल्ह्यातील मोरगाव (भाकरे) या छोट्याशा गावातील प्रवीण जंजाळ यांनी २०१९ मध्ये भारतीय सैन्यात प्रवेश केला होता. देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगून त्यांनी सैन्याची वाट निवडली आणि अखेर देशासाठीच सर्वोच्च बलिदान दिले. ७ जुलै २०२४ रोजी जम्मू-काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यातील चित्रीग्राम परिसरात दहशतवाद्यांविरोधात शोध मोहीम आणि नाकाबंदी सुरू असताना अचानक दहशतवाद्यांनी गोळीबार केला. या चकमकीत प्रवीण जंजाळ यांनी अतुलनीय धैर्य, शौर्य आणि आत्मविश्वास दाखवत दहशतवाद्यांचा सामना केला. मात्र मातृभूमीचे रक्षण करताना त्यांना वीरमरण आले. विशेष म्हणजे त्यांच्या विवाहाला अवघे एक वर्ष पूर्ण झाले होते. संसाराची स्वप्ने नुकतीच आकार घेत असतानाच देशसेवेच्या वेदीवर त्यांनी आपले आयुष्य अर्पण केले. त्यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील आणि मोठा भाऊ असा परिवार आहे. “आमचा संसार अर्ध्यावरच थांबला, पण त्यांचे बलिदान आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे,” अशा शब्दांत वीरपत्नी शामबाला प्रवीण जंजाळ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. पतीच्या आठवणीने डोळे पाणावले असले तरी देशासाठी त्यांनी दिलेल्या बलिदानाचा सार्थ अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.

१४ ऑगस्ट रोजी केंद्र सरकारने शहीद प्रवीण जंजाळ यांच्या अद्वितीय शौर्याची दखल घेत त्यांना मरणोत्तर कीर्तीचक्र प्रदान करण्याची घोषणा केली. हा सन्मान केवळ जंजाळ कुटुंबासाठीच नव्हे, तर संपूर्ण अकोला जिल्हा आणि महाराष्ट्रासाठी गौरवाचा क्षण ठरला आहे.

कीर्तीचक्र सन्मानाची बातमी कळताच कुटुंबीय भावूक झाले. गावकऱ्यांच्या डोळ्यांत अभिमानासोबतच शहीद प्रवीण यांच्या आठवणींनी अश्रू तरळले. त्यांच्या मित्रपरिवारालाही आपल्या जिवलग मित्राच्या शौर्याचा अभिमान वाटत असला तरी त्याची उणीव कायम जाणवत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

देशासाठी दिलेले हे सर्वोच्च बलिदान आणि त्याबद्दल मिळालेला कीर्तीचक्र सन्मान यामुळे शहीद प्रवीण जंजाळ यांचे नाव आता केवळ मोरगावपुरते मर्यादित राहिले नसून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात अभिमानाने घेतले जात आहे. त्यांच्या शौर्याची गाथा भावी पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top