Mahabreaking

[breaking_news]

ST bus running empty :रिकामी धावणारी एसटी प्रवाशांसाठी सुरू करा; जामनेर-लाखनवाडा बस आंबेटाकळीपर्यंत वाढवा

ST bus running empty : जामनेर आगाराच्या ‘जामनेर-लाखनवाडा’ (व्हाया अजिंठा-बुलढाणा) या जलद बसफेरीचा अधिकृत विस्तार आंबेटाकळीपर्यंत करण्यात यावा, अशी मागणी प्रवासी वर्गातून जोर धरत आहे. सध्या ही बस दररोज रात्री लाखनवाडा येथून आंबेटाकळीपर्यंत रिकामी नेली जाते आणि सकाळी पुन्हा रिकामीच परत आणली जाते. मात्र, या मार्गावरील प्रवाशांना बसमध्ये प्रवासाची परवानगी दिली जात नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

ST bus running empty

दररोज १० किमी ‘डेड रन’, प्रवाशांना मात्र नकार; एसटीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह

बुलढाणा : जामनेर आगाराच्या ‘जामनेर-लाखनवाडा’ (व्हाया अजिंठा-बुलढाणा) या जलद बसफेरीचा अधिकृत विस्तार आंबेटाकळीपर्यंत करण्यात यावा, अशी मागणी प्रवासी वर्गातून जोर धरत आहे. सध्या ही बस दररोज रात्री लाखनवाडा येथून आंबेटाकळीपर्यंत रिकामी नेली जाते आणि सकाळी पुन्हा रिकामीच परत आणली जाते. मात्र, या मार्गावरील प्रवाशांना बसमध्ये प्रवासाची परवानगी दिली जात नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जामनेर आगाराची ही बसफेरी अनेक वर्षांपासून लाखनवाडा येथे मुक्कामी येते. परंतु लाखनवाडा येथे बस पार्किंग, वळण घेण्यासाठी आवश्यक जागा तसेच चालक-वाहकांच्या निवास व भोजनाची पुरेशी व्यवस्था नसल्याने संबंधित कर्मचारी रात्री बस आंबेटाकळी येथील पेट्रोल पंप परिसरात मुक्कामी घेऊन जातात. तेथे वाहन पार्किंग, भोजन व निवासाची सोय उपलब्ध असल्यामुळे ही व्यवस्था करण्यात येत असल्याचे सांगितले जाते.

यामुळे दररोज रात्री ५ किलोमीटर आणि सकाळी ५ किलोमीटर असा एकूण १० किलोमीटरचा ‘डेड रन’ सुरू आहे. या प्रवासात बस पूर्णपणे रिकामी धावत असल्याने एसटी महामंडळाचा डिझेल खर्च वाढत असून आर्थिक नुकसान होत असल्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे, बुलढाणा किंवा इतर ठिकाणांहून आंबेटाकळीला जाणारे प्रवासी या बसमध्ये असले तरी त्यांना लाखनवाडा येथेच उतरविण्यात येते. आंबेटाकळी हा अधिकृत थांबा नसल्याचे कारण देत त्यांना पुढील प्रवासासाठी परवानगी दिली जात नाही. रात्रीच्या वेळी पर्यायी वाहतुकीची सुविधा उपलब्ध नसल्याने प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, गाडी प्रत्यक्षात आंबेटाकळीपर्यंत जात असताना केवळ तिकीट व्यवस्थेच्या कारणावरून प्रवाशांना नाकारले जाते, हे अन्यायकारक आहे. त्यामुळे बस रिकामी धावण्याऐवजी प्रवाशांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.

या प्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी लाखनवाडा येथे चालक-वाहकांच्या मुक्काम व भोजनाची व्यवस्था करावी किंवा आंबेटाकळी येथे सर्व सुविधा उपलब्ध असल्याने या बसफेरीचा अधिकृत विस्तार करून ती ‘जामनेर-आंबेटाकळी’ अशी घोषित करावी, अशी मागणी प्रवासी व नागरिकांकडून करण्यात येत आहे.

या मागणीमुळे एकीकडे प्रवाशांची गैरसोय दूर होईल, तर दुसरीकडे एसटी महामंडळाचे दररोज होणारे इंधन व आर्थिक नुकसानही टळेल, असा विश्वास प्रवासी वर्गाने व्यक्त केला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top