Shocking: स्मशानभूमीत वास्तव्यास असलेल्या ३४ वर्षीय महिलेने अंगावर डिझेल ओतून पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना शनिवार, 6 जून रोजी दुपारी घडली. या घटनेत महिला गंभीररित्या भाजल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. शारदा प्रकाश धनसरवाड (वय ३४) असे मृतक महिलेचे नाव आहे. त्या मूळच्या धानकी (ता. उमरखेड, जि. यवतमाळ) येथील रहिवासी होत्या.त्याच स्मशानभूमीत त्यांच्या पार्थीवावर 7 जून रोजी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

साखरखेर्डा येथील घटना ; मोठ्या प्रमाणात भाजल्याने महिलेचा जागीच मृत्यू
साखरखेर्डा : स्मशानभूमीत वास्तव्यास असलेल्या ३४ वर्षीय महिलेने अंगावर डिझेल ओतून पेटवून घेतल्याची धक्कादायक घटना शनिवार, 6 जून रोजी दुपारी घडली. या घटनेत महिला गंभीररित्या भाजल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. शारदा प्रकाश धनसरवाड (वय ३४) असे मृतक महिलेचे नाव आहे. त्या मूळच्या धानकी (ता. उमरखेड, जि. यवतमाळ) येथील रहिवासी होत्या.त्याच स्मशानभूमीत त्यांच्या पार्थीवावर 7 जून रोजी सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रकाश रमेश धनसरवाड हे आपल्या कुटुंबासह स्मशानजोगी व्यवसायानिमित्त या भागात आले होते. काही सामाजिक कार्यकर्त्यांच्या पुढाकारातून त्यांना साखरखेर्डा परिसरातील तीन स्मशानभूमींची स्वच्छता व वृक्षसंवर्धनाचे काम करण्याचा सल्ला देण्यात आला होता. या कामासाठी स्थानिक नागरिकांकडून त्यांना मदतही करण्यात येत होती. काही महिन्यांतच या कुटुंबाची गावात चांगली ओळख निर्माण झाली होती. लोकवर्गणीतून माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामभाऊ जाधव आणि सेवानिवृत्त कनिष्ठ अभियंता संतोष मोरे यांच्या पुढाकाराने त्यांच्यासाठी एक छोटे घरही उभारण्यात आले होते. शनिवारी दुपारी प्रकाश धनसरवाड हे चहा आणण्यासाठी बसस्थानक परिसरात गेले होते. त्यावेळी त्यांची पत्नी शारदा धनसरवाड यांनी घरात अंगावर डिझेल ओतून पेटवून घेतल्याचे सांगण्यात येत आहे. त्या वेळी त्यांची मुले स्मशानभूमीतील झाडाखाली खेळत होती. घटनेनंतर शारदा या संपूर्ण जळालेल्या अवस्थेत घरात आढळून आल्या.
घटनेची माहिती मिळताच त्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. शवविच्छेदनानंतर रात्री उशिरा त्यांच्यावर त्याच स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.या प्रकरणी साखरखेर्डा पोलीस ठाण्यात पोलीस हेडकॉन्स्टेबल नामदेव काळे यांनी प्रकाश धनसरवाड यांच्या फिर्यादीवरून आकस्मिक मृत्यूची नोंद (मर्ग) केली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप मेंधने करीत आहेत.घटनेमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.

