TET exam : प्राथमिक शिक्षक पदासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) रविवार, २८ जून रोजी आयोजित करण्यात आली असून बुलढाणा जिल्ह्यातील एकूण ७,१७४ उमेदवार या परीक्षेला बसणार आहेत. परीक्षेसाठी बुलढाणा शहर व परिसरातील २२ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.

२८ जून रोजी शिक्षक पात्रता परीक्षा; परीक्षा निकोप व पारदर्शकपणे घेण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश
बुलढाणा : प्राथमिक शिक्षक पदासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) रविवार, २८ जून रोजी आयोजित करण्यात आली असून बुलढाणा जिल्ह्यातील एकूण ७,१७४ उमेदवार या परीक्षेला बसणार आहेत. परीक्षेसाठी बुलढाणा शहर व परिसरातील २२ परीक्षा केंद्रे निश्चित करण्यात आली आहेत.
विद्यार्थी आणि शिक्षकांच्या भवितव्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेली ही परीक्षा निकोप, पारदर्शक आणि सुरळीत वातावरणात पार पाडावी, असे निर्देश टीईटी परीक्षा आयोजन व सनियंत्रण समितीचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी प्रवीण देवरे यांनी संबंधित सर्व प्रशासकीय यंत्रणांना दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, इयत्ता १ ली ते ५ वी अध्यापनासाठी असलेल्या पेपर क्रमांक १ साठी ५,१५३ उमेदवारांनी नोंदणी केली आहे. तर इयत्ता ६ वी ते ८ वी अध्यापनासाठी असलेल्या पेपर क्रमांक २ साठी एकूण ७,१७४ उमेदवार प्रविष्ट झाले आहेत.
टीईटी परीक्षा आयोजन व सनियंत्रण समितीची बैठक २१ मे २०२६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जिल्हाधिकारी प्रवीण देवरे यांनी परीक्षा केंद्रांवर पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना दिल्या. तसेच सर्व परीक्षा केंद्रांवर सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित ठेवणे, गोपनीय साहित्याच्या सुरक्षित साठवणुकीसाठी जिल्हा कोषागारात आवश्यक व्यवस्था करणे आणि परीक्षेसाठी आवश्यक कर्मचारीवर्गाची नियुक्ती करणे याबाबत निर्देश दिले.
बैठकीस जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचे प्रतिनिधी, माध्यमिक शिक्षण विभागाचे प्रतिनिधी, शिक्षणाधिकारी (योजना) वैशाली ठग, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) विकास पाटील, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डाएट) चे प्राचार्य मारोती गायकवाड तसेच जिल्हा कोषागार अधिकारी राठोड उपस्थित होते.
टीईटी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने सर्व आवश्यक तयारी पूर्ण केली असून परीक्षा शांततापूर्ण, पारदर्शक आणि गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पडावी यासाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
ऑगस्ट 2028 पर्यंत शिक्षकांना मिळाली मुदत
सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संथा आणि खासगी अनुदानीत शाळांमधील वर्ग एक ते आठवीला शिकवणार्या शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाविरुदध्द शिक्षक संघटनांनी रिव्हू पिटीशन दाखल केली होती.या याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळत टीईटी परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य असल्याचे स्पष्ट केले. तसेच टीईटी उत्तीर्ण होण्यासाठी शिक्षकांना आणखी एक वर्ष म्हणजे ऑगस्ट 2028 पर्यंत मुदत दिली आहे. या मुदतीत जे शिक्षक टीईटी उत्तीर्ण होणार नाहीत त्यांना सेवानिवृत्त व्हावे लागणार आहे. त्यामुळे, टीईटी परीक्षेला महत्व आले आहे.

