Off-season work begins : पेनगंगा साखर कारखाना प्रा.लि. येथे गाळप हंगाम २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर ऑफ सिझनमध्ये करण्यात येणाऱ्या विविध दुरुस्ती, देखभाल व आधुनिकीकरणाच्या कामांचा विधिवत पूजन करून शुभारंभ करण्यात आला. यावेळी कारखान्याचे चेअरमन अनिल गुंजाळ, अधिकारी, विभागप्रमुख तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ऊस गाळप क्षमता २५०० मे.टन प्रतिदिन; पेनगंगा कारखान्यात देखभाल व आधुनिकीकरणाला प्रारंभ
पंडित सावळे
मासरुळ : पेनगंगा साखर कारखाना प्रा.लि. येथे गाळप हंगाम २०२६-२७ च्या पार्श्वभूमीवर ऑफ सिझनमध्ये करण्यात येणाऱ्या विविध दुरुस्ती, देखभाल व आधुनिकीकरणाच्या कामांचा विधिवत पूजन करून शुभारंभ करण्यात आला. यावेळी कारखान्याचे चेअरमन अनिल गुंजाळ, अधिकारी, विभागप्रमुख तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कारखान्याच्या विविध विभागांमध्ये कर्मचाऱ्यांच्या हस्ते पूजा-अर्चना करून ऑफ सिझन कामांना सुरुवात करण्यात आली. आगामी गाळप हंगामात अधिकाधिक ऊस गाळपाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी विविध विभागांमध्ये आवश्यक दुरुस्ती, यंत्रसामग्रीचे नूतनीकरण, देखभाल आणि कार्यक्षमता वाढविण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. ऑफ सिझन कालावधीत सर्व विभागांनी नियोजित वेळेत आणि दर्जेदार पद्धतीने कामे पूर्ण करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
ऑफ सिझन देखभाल आणि दुरुस्ती कामांसाठी कर्मचारी वर्गाला कामावर हजर करण्यात आले असून कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (पीएफ) भरणा तसेच वेतनासंदर्भातील प्रलंबित प्रश्न व्यवस्थापनाने मार्गी लावल्याबद्दल कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. त्यामुळे कर्मचारी वर्गामध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून आगामी गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग घेण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी मार्गदर्शन करताना चेअरमन अनिल गुंजाळ यांनी सांगितले की, कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन २५०० मे.टनपर्यंत वाढली असून मागील हंगामात या क्षमतेची यशस्वी चाचणी पूर्ण क्षमतेने घेण्यात आली. तसेच कारखान्याने मागील हंगामात शेतकऱ्यांना विदर्भातील सर्वाधिक ३१२१ रुपये दर अदा करून शेतकरी हित जपले आहे.
आगामी गाळप हंगामात कोणतेही अनावश्यक तांत्रिक अडथळे निर्माण होऊ नयेत, यासाठी सर्व यंत्रसामग्रीचे मेंटेनन्स नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी समन्वयाने काम करून आगामी हंगामात उच्चांकी ऊस गाळप व विक्रमी कामगिरी साध्य करण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
गुंजाळ यांनी पुढे सांगितले की, कारखाना परिसरात ऊस लागवड क्षेत्रात सातत्याने वाढ होत आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना अल्प दरात प्रेसमड उपलब्ध करून देण्यात आले असून लवकरच कारखान्याच्या नर्सरीमार्फत अल्प दरात ऊस बेणे उपलब्ध करून देण्याचा निर्णयही घेण्यात येणार आहे. या उपक्रमांना शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून त्याचा सकारात्मक परिणाम ऊस क्षेत्रवाढीवर होत आहे.
परिसरातील शेतकऱ्यांनी अधिकाधिक ऊस लागवडीकडे वळून कारखान्याच्या ऊस विकास कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. ऊस क्षेत्रवाढीमुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासोबतच कारखान्याची प्रगती आणि कर्मचारी-कामगारांचे आर्थिक स्थैर्यही अधिक बळकट होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

