Mahabreaking

[breaking_news]

Onion storage shed demolished: शेतीच्या वादातून कांदाचाळ जेसीबीने उद्ध्वस्त; साडेचार लाखांचे नुकसान, चौघांविरुद्ध गुन्हा

Onion storage shed demolished: तालुक्यातील सावखेड भोई शिवारात शेतीच्या वादातून एका शेतकऱ्याच्या कांदाचाळीची जेसीबीच्या साहाय्याने तोडफोड करून कांद्यांची नासधूस केल्याची घटना गुरुवारी (दि. ४) सकाळी घडली. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी चार जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Onion storage shed demolished

 सावखेड भोईत शेतातील कांद्यांची नासधूस; चाऱ्यालाही आग, महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

गजानन तिडके 

देऊळगाव राजा  : तालुक्यातील सावखेड भोई शिवारात शेतीच्या वादातून एका शेतकऱ्याच्या कांदाचाळीची जेसीबीच्या साहाय्याने तोडफोड करून कांद्यांची नासधूस केल्याची घटना गुरुवारी (दि. ४) सकाळी घडली. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलिसांनी चार जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अरुणा कारभारी डोणे (वय ३५, रा. सावखेड भोई) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी व आरोपी  हे एकमेकांचे नातेवाईक असून, शेतीच्या वादातून हा प्रकार घडल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

आरोपी रुख्मिणी डोणे (रा. सावखेड भोई), गंगा पवार (रा. आळंदी, ता. खेड, जि. पुणे), बाबुराव कामटे व अभिजित कुमार (दोघे रा. भिवगाव, ता. देऊळगाव राजा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारीनुसार, आरोपींनी जेसीबीच्या सहाय्याने  फिर्यादीच्या शेतातील कांदाचाळ तोडली. तसेच कांदाचाळीत साठवून ठेवलेल्या कांद्यांची नासधूस करण्यात आली. या प्रकारात फिर्यादीचे सुमारे ४ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा आरोप आहे.

याशिवाय आरोपी क्रमांक १ यांनी शेतातील चाऱ्याला आग लावल्याने सुमारे २४ हजार रुपयांचे नुकसान झाले. या दोन्ही घटनांमुळे एकूण ४ लाख ७४ हजार रुपयांचे आर्थिक नुकसान झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान, फिर्यादीची मुलगी अश्विनी डोणे हिला आरोपींनी शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक २६४/२०२६ दाखल करण्यात आला असून पुढील तपास ठाणेदार ब्रम्हा गिरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस हेड कॉन्स्टेबल संजय गोरे करीत आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top