Mahabreaking

[breaking_news]

The town of Paturda :डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली पातुर्डा नगरी भीमगर्जनेने दुमदुमली

The town of Paturda : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पातुर्डा नगरीत समता दिनानिमित्त विविध सामाजिक, धार्मिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम उत्साहात पार पडले. निळ्या जनसागराच्या उपस्थितीत संपूर्ण परिसर भीमगर्जनेने दुमदुमून गेला.

The town of Paturda

समता दिनानिमित्त विविध सामाजिक  व प्रबोधनात्मक कार्यक्रम उत्साहात संपन्न

शेषराव शिरसाट

पातुर्डा बु: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पातुर्डा नगरीत समता दिनानिमित्त विविध सामाजिक, धार्मिक आणि प्रबोधनात्मक कार्यक्रम उत्साहात पार पडले. निळ्या जनसागराच्या उपस्थितीत संपूर्ण परिसर भीमगर्जनेने दुमदुमून गेला.

prograam

ऐतिहासिक पार्श्वभूमीनुसार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी २९ मे १९२९ रोजी पातुर्डा येथे मुक्काम केला होता. त्या काळात अस्पृश्य समाजाला सार्वजनिक विहिरीवरून पाणी भरण्यास मनाई केली जात होती. सामाजिक विषमता आणि अस्पृश्यतेविरोधात संघर्ष करत असताना डॉ. आंबेडकरांनी पातुर्डा येथील सार्वजनिक विहीर अस्पृश्य समाजासाठी खुली करून सामाजिक समतेचा संदेश दिला होता. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ ग्रामस्थांकडून दरवर्षी २९ मे रोजी ‘समता दिन’ उत्साहात साजरा करण्यात येतो.

यावर्षीही भारतीय बौद्ध महासभा, तालुका शाखा संग्रामपूर (जि. बुलढाणा) यांच्या वतीने २० ते २९ मे दरम्यान भंते बी. सारिपुत्त यांच्या मार्गदर्शनाखाली श्रामणेर बोधाचार्य प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शिबिरासाठी केंद्रीय शिक्षक म्हणून ज्ञानोबा कांबळे यांची नियुक्ती करण्यात आली होती.

शिबिरादरम्यान पातुर्डा, कोद्री, देऊळगाव, कवठळ, पळशी, झाशी व कुंदेगाव येथील धम्म उपासक-उपासिकांनी श्रामणेर संघाला भोजन व फलाहाराची व्यवस्था केली. २८ मे रोजी सायंकाळी कॅन्डल मार्च काढण्यात आला, तर २९ मे रोजी शिबिराचा समारोप कार्यक्रम उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष अमोल खंडेराव होते. प्रारंभी महापुरुषांच्या प्रतिमांचे पूजन करून सामुदायिक बुद्धवंदना घेण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून समता सैनिक दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व स्टाफ ऑफिसर एस. के. भंडारे, राज्य संघटक अॅड. भीमराव तायडे, बुलढाणा उत्तर जिल्हाध्यक्ष एस. एस. वले, महिला शाखेच्या जिल्हाध्यक्षा छायाताई बांगर, नागपूर पूर्व जिल्हाध्यक्ष सुनील सावंग यांच्यासह भारतीय बौद्ध महासभा व समता सैनिक दलाचे विविध पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी समता सैनिक दलाच्या जवानांनी पथसंचलन करून उपस्थित मान्यवरांना सलामी दिली. कार्यक्रमाचे संचालन महासचिव मिलिंद वानखडे यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तालुका पदाधिकारी, पातुर्डा येथील धम्म उपासक-उपासिका, तरुण मंडळ तसेच फुले-शाहू-आंबेडकर विचारधारेसाठी कार्यरत कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. उपस्थितांसाठी सामुदायिक भोजनाचीही व्यवस्था करण्यात आली होती.

विशेष म्हणजे, हा कार्यक्रम डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मुक्काम केलेल्या जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेच्या परिसरातच आयोजित करण्यात आला होता.

दरम्यान, भदंत ज्ञानज्योती महाथेरो यांच्या नेतृत्वाखाली भिक्षू संघाने २६ ते २९ मे दरम्यान जळंब ते पातुर्डा धम्म पदयात्रा काढली. माटरगाव (बु.), मच्छिंद्रखेड, तरोडा (डी), कालखेडा, पोहूरपूर्णा व खिरोडा मार्गे २९ मे रोजी सकाळी पदयात्रेचे पातुर्डा येथे आगमन झाले. उपस्थित नागरिकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विहिरीजवळ त्यांचे उत्साहात स्वागत करून वाजतगाजत सभा स्थळी नेले.

यावेळी डॉ. भंते धम्मचेती, भंते अमरज्योती आणि भदंत ज्ञानज्योती महाथेरो यांनी उपस्थितांना धम्मदेशना देत सामाजिक ऐक्य व संघटन बळकट करण्याचे आवाहन केले. तसेच भोनगाव येथील बौद्ध स्तूप आंदोलनासाठी सहकार्य करण्याचेही आवाहन करण्यात आले.

सायंकाळी भीमगीत गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन पातुर्डा ग्रामपंचायत प्रशासनाच्या सहकार्याने करण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top