Case Registered : वाशीम जिल्ह्यातील मालेगाव येथील एका खासगी रुग्णालयात कथितरित्या गर्भलिंग निदान चाचणी केल्याप्रकरणी आरोग्य विभागाने कारवाई करत रुग्णालय संचालक, कर्मचारी व एका मध्यस्थासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे मालेगाव परिसरात खळबळ उडाली असून प्रकरणाची चर्चा मेहकर व डोणगाव परिसरातही सुरू आहे.

आरोग्य विभागाच्या कारवाईनंतर खळबळ; एका संशयिताचे आरेगावशी संबंध असल्याची माहिती
डोणगाव/मालेगाव : वाशीम जिल्ह्यातील मालेगाव येथील एका खासगी रुग्णालयात कथितरित्या गर्भलिंग निदान चाचणी केल्याप्रकरणी आरोग्य विभागाने कारवाई करत रुग्णालय संचालक, कर्मचारी व एका मध्यस्थासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या कारवाईमुळे मालेगाव परिसरात खळबळ उडाली असून प्रकरणाची चर्चा मेहकर व डोणगाव परिसरातही सुरू आहे.
मालेगाव ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुहास वाहुळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गोपनीय माहितीच्या आधारे आरोग्य विभागाच्या पथकाने २३ मे रोजी सकाळी मालेगाव येथील संबंधित रुग्णालयात पडताळणी मोहीम राबविली. पथकात वैद्यकीय अधिकारी व इतर कर्मचाऱ्यांचा समावेश होता.फिर्यादीतील माहितीनुसार, एका बनावट रुग्णाच्या माध्यमातून कथित गर्भलिंग निदानाबाबत माहितीची शहानिशा करण्यात आली. यावेळी मध्यस्थ म्हणून काम केल्याचा संशय असलेल्या व्यक्तीमार्फत रुग्णालयात संपर्क साधण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. तसेच रुग्णालयातील काही कर्मचाऱ्यांकडून पैशांची मागणी झाल्याचाही आरोप फिर्यादीत नमूद आहे.
त्यानंतर पथकाने रुग्णालयात धाड टाकून तपासणी केली. या प्रकरणी रुग्णालय संचालक डॉ. विवेक माने, रुग्णालयातील दोन कर्मचारी, एक अज्ञात महिला डॉक्टर आणि मध्यस्थ म्हणून संशयित असलेल्या व्यक्तीविरुद्ध PCPNDT कायद्यान्वये (गर्भधारणापूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्रज्ञान प्रतिबंधक कायदा) विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयित मध्यस्थ हा बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील आरेगाव येथील रहिवासी असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, तपासानंतर अधिक माहिती स्पष्ट होणार आहे.

