Mahabreaking

[breaking_news]

Dehtyag Satyagraha Suspended :उपविभागीय अधिकाऱ्यांच्या लिखित आश्वासनानंतर ‘देहत्याग सत्याग्रह’ स्थगित

Dehtyag Satyagraha Suspended : पिप्री खोद्री शिवारातील गट क्रमांक ३६ संदर्भातील शेतमोजणी, हद्द कायम करणे आणि संबंधित कायदेशीर अभिलेख उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी सुलज येथील शेतकरी ज्ञानदेव ओंकार नळकांडे यांनी सुरू केलेल्या टप्प्याटप्प्याच्या सत्याग्रहाला उपविभागीय अधिकाऱ्यांच्या लिखित आश्वासनानंतर तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे.

Dehtyag Satyagraha Suspended

शेतमोजणी, हद्द कायम व चौकशीबाबत प्रशासनाची कार्यवाही सुरू

जळगाव जामोद : पिप्री खोद्री शिवारातील गट क्रमांक ३६ संदर्भातील शेतमोजणी, हद्द कायम करणे आणि संबंधित कायदेशीर अभिलेख उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी सुलज येथील शेतकरी ज्ञानदेव ओंकार नळकांडे यांनी सुरू केलेल्या टप्प्याटप्प्याच्या सत्याग्रहाला उपविभागीय अधिकाऱ्यांच्या लिखित आश्वासनानंतर तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे.

भूमिअभिलेख विभागाकडून शेतमोजणी आणि अभिलेख प्रक्रियेत झालेल्या कथित विलंब व त्रुटींविरोधात नळकांडे यांनी २८ मेपासून उपविभागीय अधिकारी कार्यालय, जळगाव जामोद येथे दिवसनिहाय सत्याग्रह सुरू केला होता. त्यानुसार २८ मे रोजी लाक्षणिक सत्याग्रह, २९ मे रोजी अन्नत्याग, ३० मे रोजी जलत्याग आणि ३१ मे रोजी देहत्यागाचा इशारा देण्यात आला होता.

सत्याग्रहाच्या निवेदनातील बहुसंख्य मागण्या भूमिअभिलेख कार्यालयाशी संबंधित असल्याने उपविभागीय अधिकारी शैलेश काळे यांनी तत्काळ दखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाहीचे निर्देश दिले. त्यानुसार सर्वे क्रमांक १८ व २० मधील खातेदारांच्या गटाची प्रत्यक्ष उपस्थितीत मोजणी व हद्द कायम करण्यासाठी ४ जून रोजी कार्यवाही करण्यात येणार असल्याचे लिखित पत्र देण्यात आले. संबंधित शेतकऱ्यांना मोजणीसंदर्भातील नोटिसाही देण्यात आल्या.

तसेच संबंधित प्रकरणात कर्तव्यात कसूर झाल्याच्या तक्रारींची चौकशी करून आवश्यक शिस्तभंगात्मक कार्यवाहीबाबत अहवाल सादर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याचे भूमिअभिलेख विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याची माहिती देण्यात आली.  दरम्यान, निवेदनातील काही मागण्या जळगाव जामोद पोलीस ठाण्याशी संबंधित असल्याने उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी तपास अधिकाऱ्यांना चौकशी गतीमान करण्याच्या सूचना दिल्या असून, संबंधित अहवाल पुढील मान्यतेसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्याचे निर्देश दिल्याचे सांगण्यात आले.

नायब तहसीलदारांच्या माध्यमातून उपविभागीय अधिकाऱ्यांकडून लिखित आश्वासन देण्यात आल्यानंतर आणि मागण्यांवर टप्प्याटप्प्याने कार्यवाही होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आल्याने ज्ञानदेव नळकांडे यांनी देहत्याग सत्याग्रहाला तूर्तास स्थगिती दिली. दरम्यान, संबंधित प्रकरणात निश्चित मुदतीत कार्यवाही न झाल्यास आणि शेतकऱ्यांवर अन्याय सुरू राहिल्यास भूमिअभिलेख कार्यालयाविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे. सत्याग्रहाला विविध पक्षांच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून पाठिंबा दिला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top