Sand Smugglers Audacity Soars : अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकाच्या कामात अडथळा निर्माण करून रेतीने भरलेला टिप्पर पळवून नेल्याची धक्कादायक घटना देऊळगाव राजा शहराबाहेरील जालना बायपास मार्गावर उघडकीस आली आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात विना क्रमांकाच्या टिप्पर चालकासह बोलेरो वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सरकारी कारवाईत अडथळा; अवैध रेती वाहतुकीप्रकरणी टिप्पर व बोलेरो चालकाविरुद्ध गुन्हा
गजानन तिडके
देऊळगाव राजा : अवैध रेती वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल पथकाच्या कामात अडथळा निर्माण करून रेतीने भरलेला टिप्पर पळवून नेल्याची धक्कादायक घटना देऊळगाव राजा शहराबाहेरील जालना बायपास मार्गावर उघडकीस आली आहे. या प्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात विना क्रमांकाच्या टिप्पर चालकासह बोलेरो वाहन चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात दाखल फिर्यादीनुसार, संजय बंडूजी बरांडे (वय ४८), ग्राम महसूल अधिकारी, असोला जहाँ यांनी दिलेल्या तक्रारीवरून कायम गुन्हा क्रमांक २४९/२०२६ अंतर्गत भारतीय न्याय संहिता कलम २२१, ३०३(३) तसेच अवैध गौण खनिज अधिनियम कलम २१(१) व २१(२) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना २५ मे रोजी मध्यरात्री १२.२५ वाजताच्या सुमारास जालना बायपास रोडवरील डॉ. शिंदे यांच्या शाळेजवळ घडली. महसूल पथक अवैध रेती वाहतुकीवर नियंत्रणासाठी गस्त घालत असताना दोन टिप्पर संशयास्पदरीत्या रेती वाहतूक करताना आढळले. यापैकी एका टिप्परला अडविण्यात महसूल पथकाला यश आले, तर दुसऱ्या टिप्परचा पाठलाग सुरू करण्यात आला.
दरम्यान, बोलेरो वाहन क्रमांक एमएच-४७-एवाय-३८७३ चालकाने महसूल पथकाच्या वाहनासमोर वाहन चालवत पाठलागात अडथळा निर्माण केल्याचा आरोप आहे. यामुळे अवैध रेती वाहतूक करणारा टिप्पर पसार झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. तसेच थांबविण्यात आलेला टिप्परही महसूल कर्मचाऱ्यांना धमकावून पळवून नेल्याचा आरोप करण्यात आला आहे. महसूल विभागाकडून अवैध रेती उपसा आणि वाहतुकीवर नियंत्रणासाठी कारवाई सुरू असतानाच रेती तस्करांची कथित मुजोरी वाढल्याची चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वीही महसूल अधिकाऱ्यांवर दबाव टाकण्याच्या घटना घडल्याने प्रशासनासमोर आव्हान निर्माण झाले आहे. या प्रकरणाचा पुढील देऊळगाव राजाचे ठाणेदार ब्रम्हा गिरी यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहेत

