Mahabreaking

[breaking_news]

Contract Worker Dies :खांबावर दुरुस्तीचे काम करीत असताना वीजेचा धक्का; कंत्राटी कामगाराचा मृत्यू

Contract Worker Dies:विद्युत खांबावर दुरुस्तीचे काम करीत असताना वीजेचा धक्का बसल्याने ३५ वर्षीय कंत्राटी कामगाराचा मृत्यू  झाल्याची घटना 26 मे रोजी घडली. बद्रीनाथ लक्ष्मण लंबे  असे मृत कामगाराचे नाव आहे.विशेष म्हणजे साखरखेर्डा परिसरात गत २५ वर्षांत ही पाचवी घटना आहे.

Contract Worker Dies

साखरखेर्डा येथे  २५ वर्षांत पाचवी घटना; शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार

साखरखेर्डा: विद्युत खांबावर दुरुस्तीचे काम करीत असताना वीजेचा धक्का बसल्याने ३५ वर्षीय कंत्राटी कामगाराचा मृत्यू  झाल्याची घटना 26 मे रोजी घडली. बद्रीनाथ लक्ष्मण लंबे  असे मृत कामगाराचे नाव आहे.विशेष म्हणजे साखरखेर्डा परिसरात गत २५ वर्षांत ही पाचवी घटना आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी आलेल्या वादळामुळे साखरखेर्डा परिसरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. तब्बल पाच तासांनंतर रात्री सुमारे १० वाजता वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. मात्र, काही ग्रामीण भागांमध्ये वीजपुरवठा अद्याप बंदच होता. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी रात्री १.३० वाजेपर्यंत विविध ठिकाणी दुरुस्तीचे काम करून वीजपुरवठा पूर्ववत करण्याचा प्रयत्न केला.

पिंपळगाव सोनारा परिसरातील काही ठिकाणी दुरुस्तीचे काम शिल्लक असल्याने मंगळवारी सकाळी बद्रीनाथ लंबे हे कामासाठी तेथे गेले होते. सकाळी सुमारे ९ वाजता ते पिंपळगाव सोनारा येथील मारोती आश्रू वायाळ यांच्या शेतातील ट्रान्सफॉर्मरजवळील वीजवाहक खांबावर चढून काम करत असताना अचानक त्यांचा वीजवाहक तारेशी संपर्क आला. त्यामुळे त्यांना जबरदस्त विजेचा धक्का बसला आणि ते खांबावरून खाली कोसळले.

घटनास्थळी उपस्थित असलेल्या शेतकऱ्यांनी तातडीने त्यांना साखरखेर्डा येथील डॉ. विशाल मगर यांच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना पुढील उपचारासाठी चिखली येथे हलविण्याचा सल्ला दिला. तेथे डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले. चिखली येथे शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. त्यानंतर शिंदी येथे शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दरम्यान, बद्रीनाथ लंबे यांनी काम सुरू करण्यापूर्वी साखरखेर्डा येथील ३३ केव्ही उपकेंद्रातून नियमानुसार परवानगी घेतली होती का, तसेच परवानगी घेतली असल्यास संबंधित लाईनवरील वीजपुरवठा सुरू कसा राहिला, असे प्रश्न ग्रामस्थांकडून उपस्थित करण्यात येत आहेत. त्यांच्या मृत्यूस जबाबदार कोण, याची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शिंदी येथील ग्रामस्थांनी केली आहे.

या संदर्भात कनिष्ठ अभियंता रोहित पाटील यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र संपर्क होऊ शकला नाही. वृत्त लिहिपर्यंत साखरखेर्डा पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल झालेली नव्हती.

अपघाताची माहिती मिळताच सिंदखेडराजा येथील वीज वितरण कंपनीचे उपअभियंता श्रीनिवास बडगू यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी ३३ केव्ही उपकेंद्रातील हजेरी पुस्तक उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आल्याची चर्चा आहे. तसेच कामावर असलेल्या ऑपरेटरकडे विविध बाबींची चौकशी करण्यात आली; मात्र अनेक प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळाली नसल्याचे समजते.

 

“कंत्राटी कामगाराच्या अपघाताची दोन दिवसांत चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल,” असे आश्वासन उपअभियंता श्रीनिवास बडगू यांनी दिले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top