Mahabreaking

[breaking_news]

Premamurti Jagdishanand Shastri :ज्या घरात कन्या असते, त्या घरात लक्ष्मी नांदते — प्रेममूर्ती जगदिशानंद शास्त्री

Premamurti Jagdishanand Shastri : ज्या घरात कन्या असते, त्या घरात लक्ष्मी नांदते, हे त्रिवार सत्य असून महिलांचे महत्त्व प्रत्येकाने जीवनात जाणले पाहिजे, असे प्रबोधन शिवमहापुराण कथाकार प्रेममूर्ती जगदिशानंद शास्त्री यांनी विविध दाखल्यांसह केले.

Premamurti Jagdishanand Shastri

अशोक इंगळे

साखरखेर्डा : ज्या घरात कन्या असते, त्या घरात लक्ष्मी नांदते, हे त्रिवार सत्य असून महिलांचे महत्त्व प्रत्येकाने जीवनात जाणले पाहिजे, असे प्रबोधन शिवमहापुराण कथाकार प्रेममूर्ती जगदिशानंद शास्त्री यांनी विविध दाखल्यांसह केले.

दि. २४ मे रोजी शिवमहापुराण कथेच्या चौथ्या दिवशी कथासादरीकरण करताना त्यांनी प्रजापतींची कथा विषद केली. “राजा कितीही मोठा असला तरी तो प्रजेच्या रक्षणासाठी असतो. मग ती कन्या असो, माता असो किंवा बहीण, सर्वांना समान न्याय देण्याची वृत्ती असणे आवश्यक आहे,” असे त्यांनी सांगितले.

घरातील वाद घरातच मिटवावेत, सून कशी आहे यापेक्षा ती घरातील लक्ष्मी आहे, या भावनेने तिच्याकडे पाहिले पाहिजे, असे सांगताना त्यांनी महिलांच्या भूमिकेचे महत्त्व अधोरेखित केले. “मुलगी असताना वडील, विवाहानंतर पती आणि आई झाल्यानंतर मुलगा तिच्या पाठीशी असतो. महिला घरात असल्यामुळेच घरात स्वच्छता, संस्कार आणि शिस्त टिकून राहते. ज्या घरात स्वच्छता असते, तेथे लक्ष्मीचा वास असतो,” असेही ते म्हणाले.

सद्गुरूंच्या दरबारात जाताना कोणत्याही संगतीची आवश्यकता नसते. सद्गुरू सर्वांसाठी समान असतात आणि भक्ती श्रद्धापूर्वक असावी, असेही त्यांनी सांगितले. “जी वस्तू आपली नाही, तिचा हट्ट करू नये; मात्र जी वस्तू आपली आहे, ती आपल्याजवळ राहणारच. संसाररूपी सागरात वावरताना दानधर्म महत्त्वाचा आहे. मनात अहंकार बाळगू नका, कारण तो कधी गळून पडेल हे सांगता येत नाही,” असे प्रबोधन त्यांनी केले.

यावेळी शिव-पार्वती विवाह सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. मंगलाष्टके आणि सुमधुर संगीतामुळे हजारो श्रोते मंत्रमुग्ध झाले होते. अनेक भाविक भक्तिभावाने नृत्य करत असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

या प्रसंगी विचारपीठावर मठाधिपती सिद्धलिंग शिवाचार्य महाराज, सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांच्यासह अनेक गुरुवर्य उपस्थित होते. विशाल शामियाना, बसण्याची व्यवस्था आणि उन्हाच्या तीव्रतेत थंड पाण्याच्या फवाऱ्यांमुळे भाविकांना कोणतीही अडचण जाणवली नाही. बाहेरगावाहून आलेल्या भाविकांसाठी निवास व भोजनाची व्यवस्थाही संस्थानतर्फे करण्यात आली होती.

दरम्यान, सकाळी शिवपाठ, श्री पलसिद्ध महास्वामी समाधीस्थळी रुद्राभिषेक, पारायण, व्याख्यान, सायंकाळी लक्ष्मण महाराजकृत शिवपाठ आणि रात्री कीर्तन असे दैनंदिन कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. शिवपाठादरम्यान महिलांची पावली हे विशेष आकर्षण ठरत आहे.

महाप्रसाद वितरणात स्वयंसेवकांची शिस्त उल्लेखनीय ठरत असून पाणी वाटपाची जबाबदारी मदनलाल जैस्वाल व नंदकिशोर रिंढे हे सातत्याने पार पाडत आहेत. शिव-पार्वती विवाह सोहळ्यानंतर उपस्थित भाविकांनी कन्यादान स्वरूपात संस्थानला पाच हजार ताटांचे योगदान दिले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top