Sexual Assault :पतीपासून विभक्त राहणाऱ्या ४० वर्षीय महिलेने शेजारी राहणाऱ्या व्यक्तीवर धमकी देत वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा तसेच गर्भपाताच्या गोळ्या जबरदस्तीने दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी पातूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

आरोपी युवकाविरुध्द गुन्हा दाखल : पिडीतेवर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू
यश गवई
पातूर : पतीपासून विभक्त राहणाऱ्या ४० वर्षीय महिलेने शेजारी राहणाऱ्या व्यक्तीवर धमकी देत वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा तसेच गर्भपाताच्या गोळ्या जबरदस्तीने दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. या प्रकरणी पातूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिलेने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, अकोला येथे दिलेल्या जबाबात, गेल्या काही वर्षांपासून माहेरी राहत असताना शेजारी राहणाऱ्या व्यक्तीने तिची ओळख व परिस्थितीचा गैरफायदा घेत धमकावून तिच्या इच्छेविरुद्ध संबंध ठेवले, असा आरोप केला आहे. “घटनेची माहिती दिल्यास कुटुंबीयांना इजा पोहोचविण्याची धमकी दिली जात होती,” असेही महिलेने जबाबात नमूद केल्याचे सांगण्यात आले.
महिलेच्या तक्रारीनुसार, मे महिन्यात आरोपीने काही गोळ्या दिल्यानंतर तिची प्रकृती बिघडली आणि रक्तस्त्राव सुरू झाला. सुरुवातीला स्थानिक स्तरावर उपचार घेतल्यानंतर प्रकृती गंभीर झाल्याने तिला अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर पुढील उपचार सुरू असून तिची प्रकृती डॉक्टरांच्या देखरेखीखाली असल्याचे सांगण्यात आले आहे.
दरम्यान, कुटुंबीयांनी पोलिसांच्या प्रतिसादाबाबत प्रश्न उपस्थित केले असून माहिती दिल्यानंतरही कारवाईला विलंब झाल्याचा आरोप केला आहे. मात्र, पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत आरोपीविरुद्ध बलात्कार, धमकी तसेच जबरदस्ती गर्भपातासंदर्भातील संबंधित गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करून त्याला अटक केल्याचे सांगितले.या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून प्रकरणाचा पुढील तपास पातूर पोलीस करीत आहेत.

