LCB Launches Crackdown :रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतुक करणार्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करीत पाच टिप्पर जप्त केले आहेत. या कारवाईत पाच चालकांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १० ब्रास रेतीसह ७६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

सावरगाव नेह परिसरात ५ चालक जेरबंद ; १० ब्रास रेतीही केली जप्त
नांदूरा : रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतुक करणार्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धडक कारवाई करीत पाच टिप्पर जप्त केले आहेत. या कारवाईत पाच चालकांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून १० ब्रास रेतीसह ७६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात विनापरवाना गौण खनिज (रेती) उत्खनन आणि चोरटी वाहतूक रोखण्यासाठी निलेश तांबे यांनी विशेष मोहिम राबविण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांनी स्वतंत्र पथके तयार करून रेतीमाफियांवर लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले होते.
दरम्यान, २१ मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गोपनीय माहिती मिळाली की, नांदूरा हद्दीतील सावरगाव नेह परिसरातून काही जण टिप्परच्या सहाय्याने विनापरवाना रेतीची वाहतूक करीत आहेत. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे यांच्या पथकाने रात्रीच्या सुमारास ग्राम सावरगाव नेह येथे सापळा रचून नाकाबंदी केली.
नाकाबंदी दरम्यान योगेश विजय काळे (रा. बेलाड, ता. मलकापूर), आकाश सुरेश कंडारकर (रा. झोडगा, ता. मलकापूर), शुभम माणिक इंगळे (रा. धरणगाव, ता. मलकापूर), लक्ष्मण धोंडू चव्हाण (रा. नेहरुनगर, ता. मोताळा) आणि प्रल्हाद सुपडा नरवाडे (रा. मेंढळी, ता. मोताळा) हे त्यांच्या ताब्यातील टिप्परमध्ये विनापरवाना रेती वाहतूक करताना आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
या कारवाईत ५ टिप्पर (अंदाजे किंमत ७५ लाख रुपये) तसेच १० ब्रास रेती (अंदाजे किंमत १ लाख रुपये) असा एकूण ७६ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पाचही चालकांविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०३(२) तसेच गौण खनिज कायद्यातील कलम २१(१) व २१(२) अंतर्गत नांदूरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांच्या आदेशानुसार तसेच अपर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा आणि अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनिल अंबुलकर यांच्या नेतृत्वात करण्यात आली. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक पंकज सपकाळे यांच्यासह वनिता शिंगणे, अमोल शेजोळ, अजीज परसुवाले, मनोज खरडे आणि शिवानंद हेलगे यांनी सहभाग घेतला.

