TET : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2025 उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना 18 मे पासून प्रमाणपत्र वितरीत करण्यात येणार आहेत. MAHATET 2025 परीक्षा दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेचा अंतिम निकाल ६ मे २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने प्रसिद्ध करण्यात आला होता.

आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहण्याचे आवाहन
बुलढाणा : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्या वतीने घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (MAHATET) 2025 उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांना 18 मे पासून प्रमाणपत्र वितरीत करण्यात येणार आहेत. MAHATET 2025 परीक्षा दिनांक २१ डिसेंबर २०२५ रोजी घेण्यात आली होती. या परीक्षेचा अंतिम निकाल ६ मे २०२६ रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने प्रसिद्ध करण्यात आला होता.
या परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची प्रमाणपत्रे संबंधित जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) तसेच मुंबई शिक्षण निरीक्षक कार्यालयांकडे वितरित करण्यात आली आहेत. पात्र उमेदवारांना प्रमाणपत्रांचे वाटप 18 मे ते ८ जून २०२६ या कालावधीत करण्यात येणार असल्याची माहिती परिषदेकडून देण्यात आली आहे.
उमेदवारांनी परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावरील सूचना काळजीपूर्वक वाचून आवश्यक मूळ कागदपत्रांसह संबंधित जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अथवा शिक्षण निरीक्षक कार्यालयाशी संपर्क साधून प्रमाणपत्र प्राप्त करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
प्रमाणपत्र घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा गुणपत्रिका, डी.टी.एड./बी.एड. उत्तीर्ण गुणपत्रक, आरक्षण प्रवर्गाचे जात प्रमाणपत्र (लागू असल्यास) , माजी सैनिक प्रमाणपत्र (लागू असल्यास), ओळखपत्र (आधार कार्ड इत्यादी) आदी कागदपत्रे लागणार आहेत.
प्रमाणपत्र वितरणाची स्वतंत्र नोंद वही ठेवण्यात येणार असून, प्रमाणपत्राच्या मागील बाजूस संबंधित उमेदवाराने शिक्षणाधिकारी अथवा शिक्षण निरीक्षक यांच्या समक्ष स्वाक्षरी करणे आवश्यक राहणार आहे.
तसेच, प्रमाणपत्र वितरणाबाबत किंवा कागदपत्रांबाबत कोणतीही तक्रार असल्यास संबंधित शिक्षणाधिकारी कार्यालयामार्फत ती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे पाठविण्यात येणार असल्याचेही प्रसिद्धीपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

