The election machinery : भारत निवडणूक आयोगाने देशातील १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ (SIR) मोहिमेचा तिसरा टप्पा जाहीर केला आहे. या मोहिमेत महाराष्ट्राचा समावेश असून, राज्यातील सुमारे ९ कोटी ८६ लाख मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे.

मतदार याद्यांची ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ मोहिम
बुलढाणा : भारत निवडणूक आयोगाने देशातील १६ राज्ये आणि ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ‘विशेष सखोल पुनरिक्षण’ (SIR) मोहिमेचा तिसरा टप्पा जाहीर केला आहे. या मोहिमेत महाराष्ट्राचा समावेश असून, राज्यातील सुमारे ९ कोटी ८६ लाख मतदारांच्या नोंदींची प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे.
महाराष्ट्रात विशेष सखोल पुनरिक्षण मोहीम अत्यंत व्यापक स्वरूपात राबवण्यात येणार आहे. यात राज्यातील एकूण ९ कोटी ८६ लाख ४४ हजार ४१३ मतदारांच्या तपशिलाची खातरजमा मतदान केंद्रस्तरीय अधिका-यांमार्फत (BLO)नियुक्त करण्यात येणार आहे. हे अधिकारी प्रत्येक मतदाराच्या घरी जाऊन माहिती गोळा करतील. या प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी राजकीय पक्षांतर्फे नेमण्यात आलेले ‘बूथ लेव्हल एजंट्स’ (BLA) त्यांना सहकार्य करणार आहेत.
सध्या सुरू असलेल्या जनगणनेच्या कामात व्यस्त असलेल्या क्षेत्रीय यंत्रणेचा विचार करून या तिसऱ्या टप्प्याचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. महाराष्ट्रातील ही प्रक्रिया जून महिन्यापासून सुरू होऊन ऑक्टोबरमध्ये पूर्ण होईल.
महाराष्ट्रासाठी असे आहे वेळापत्रक
दिनांक २० ते २९ जून २०२६ या कालावधील बीएलओ यांना प्रशिक्षण आणि पूर्वतयारी करण्यात येईल. त्यानंतर ३० जून ते २९ जुलै २०२६ या कालावधीत घरोघरी जाऊन भेटी देण्यात येतील. ५ ऑगस्ट २०२६ रोजी मसुदा मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येईल तसेच ५ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती नोंदविता येतील आणि ७ ऑक्टोबर २०२६ रोजी अंतिम मतदार यादीची प्रसिद्ध करण्यात येईल.
राजकीय पक्षांना आवाहन
भारत निवडणूक आयोगाने सर्व राजकीय पक्षांना प्रत्येक मतदान केंद्रावर आपले एजंट (BLA) नियुक्त करण्याचे आवाहन केले आहे. यामुळे मतदार यादीतून दुबार नावे तसेच मृत व्यक्तींची नावे काढणे आणि नवीन पात्र मतदारांची नोंदणी करणे ही प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि अचूक होण्यास मदत होणार आहे.

