Two-wheeler rider killed :पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वाडेगाव-पातूर मार्गावरील बाभूळगावजवळ गुरुवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

वाडेगाव-पातूर मार्गावर भीषण अपघात; ग्रामस्थांनी जखमींना तातडीने पोहचवले रुग्णालयात
राहुल सोनोने
वाडेगाव : पातूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वाडेगाव-पातूर मार्गावरील बाभूळगावजवळ गुरुवारी सायंकाळी भीषण अपघात झाला. चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून दुसरा गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सस्ती येथील सेवानिवृत्त पोलिस कर्मचारी प्रदीप रतन अंभोरे (वय ६२) आणि लक्ष्मण तुकाराम गिरे (वय ४५) हे दुचाकीने वाडेगावकडून पातूरकडे जात होते. दरम्यान, समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या एका चारचाकी वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दोघांनाही गंभीर दुखापत झाली आणि ते रस्त्यावरच पडून होते. घटनेची माहिती मिळताच परिसरातील प्रवीण दांडगे, संदेश धाडसे, गोलू पाटील, सुनील गायकवाड, वृषिकेश, विशाल भाकरे, मधुकर गावंडे आदींनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली. जखमींना तातडीने उपचारासाठी हलविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, १०८ रुग्णवाहिका सेवेशी संपर्क साधूनही दीड तास कोणतीही रुग्णवाहिका उपलब्ध झाली नसल्याचा आरोप उपस्थित नागरिकांनी केला आहे. अखेर बाभूळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील १०२ रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना अकोला येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. उपचारादरम्यान डॉक्टरांनी दोघांपैकी एकाला मृत घोषित केले, तर एकावर गंभीर अवस्थेत उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, अपघातानंतर रुग्णवाहिका वेळेत उपलब्ध झाली असती तर कदाचित मृत्यू टाळता आला असता, अशी चर्चा घटनास्थळी उपस्थित नागरिकांमध्ये सुरू होती. या घटनेमुळे आपत्कालीन आरोग्य व्यवस्थेच्या कार्यक्षमतेबाबतही प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

