Akash Phundkar : राज्यातील प्रत्येक कामगाराला त्याच्या हक्काच्या आरोग्य सुविधा मिळाल्याच पाहिजेत. कर्मचारी राज्य विमा योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या रुग्णालयांमधील वैद्यकीय सुविधांचा लाभ शेवटच्या कामगारापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारावी, असे निर्देश आकाश फुंडकर यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.

मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत वैद्यकीय सेवांची उपलब्धता वाढवण्यावर भर देण्याचे निर्देश
मुंबई : राज्यातील प्रत्येक कामगाराला त्याच्या हक्काच्या आरोग्य सुविधा मिळाल्याच पाहिजेत. कर्मचारी राज्य विमा योजनेअंतर्गत उपलब्ध असलेल्या रुग्णालयांमधील वैद्यकीय सुविधांचा लाभ शेवटच्या कामगारापर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभावी यंत्रणा उभारावी, असे निर्देश आकाश फुंडकर यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.
राज्यातील विमाधारक कामगारांची वाढती संख्या लक्षात घेता आरोग्य सुविधांचा विस्तार, जनजागृती आणि तातडीच्या वैद्यकीय सेवांची उपलब्धता वाढविण्यावर भर देण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
या बैठकीस प्रकाश आबिटकर, कामगार आयुक्त एच. पी. तुम्मोड, कर्मचारी राज्य विमा महामंडळाच्या प्रादेशिक संचालक अभिलाषा झा, उपसचिव रोशनी कदम, भारतीय मजूर संघाचे अनिल डोमणे तसेच कामगार विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत बोलताना कामगार मंत्री ॲड. फुंडकर म्हणाले की, केंद्रीय कामगार विभागाच्या माध्यमातून राज्यात कर्मचारी राज्य विमा योजनेअंतर्गत १८ नवीन रुग्णालयांना मंजुरी देण्यात आली आहे. या रुग्णालयांमुळे कामगारांना त्यांच्या निवासस्थानाजवळ किंवा कामाच्या ठिकाणी तातडीने उपचार सुविधा उपलब्ध होणार असून आरोग्य सेवा अधिक सुलभ होईल. तसेच अंधेरी (मुंबई), पुणे आणि नागपूर येथे नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरू करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. या महाविद्यालयांमुळे आरोग्य शिक्षणाला चालना मिळेल तसेच तज्ज्ञ डॉक्टरांची उपलब्धता वाढून कामगारांना अधिक दर्जेदार आरोग्य सेवा मिळण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. “केवळ सुविधा निर्माण करून चालणार नाही, तर त्या सुविधांची माहिती कामगारांपर्यंत पोहोचणे हीदेखील तितकीच महत्त्वाची बाब आहे,” असे सांगत मंत्री फुंडकर यांनी प्रत्येक विमाधारक कामगाराच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर जवळच्या रुग्णालयांची माहिती, उपलब्ध सुविधा आणि आपत्कालीन सेवा याबाबत संदेश पाठविण्याचे निर्देश दिले. यामुळे कामगारांमध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती होईल आणि आपत्कालीन परिस्थितीत त्यांना त्वरित योग्य उपचार मिळण्यास मदत होईल, असे त्यांनी नमूद केले.सध्या राज्यात सुमारे ४९ लाख विमाधारक कामगार असून केंद्र सरकारच्या नवीन कामगार कायद्याची अंमलबजावणी झाल्यानंतर या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाढत्या कामगार वर्गासाठी दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्यासाठी प्रशासनाने आतापासून सज्ज राहावे, असे आवाहनही त्यांनी केले.कामगारांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही तसेच मंजूर झालेली रुग्णालये लवकरात लवकर कार्यान्वित करण्यास प्राधान्य दिले जाईल, असेही ॲड. आकाश फुंडकर यांनी स्पष्ट केले.

