House Catches Fire in Malkapur : शहरतील अशोक नगर परिसरातील एका घराला भर दुपारी लागलेल्या भीषण आगीत गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन ८५ वर्षीय वृद्ध महिलेचा होरपळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक मंगळवार, १२ मे रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. उष्णतेची तीव्रता आणि जोरदार वाऱ्यामुळे आगीने काही मिनिटांतच रौद्ररूप धारण केल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. नर्मदाबाई लासुरकर (वय ८५) असे मृत महिलेचे नाव आहे.

मलकापूर शहरातील हृदयद्रावक घटना : जोरदार वाऱ्यामुळे पसरली आग
मलकापूर : शहरतील अशोक नगर परिसरातील एका घराला भर दुपारी लागलेल्या भीषण आगीत गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन ८५ वर्षीय वृद्ध महिलेचा होरपळून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक मंगळवार, १२ मे रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास घडली. उष्णतेची तीव्रता आणि जोरदार वाऱ्यामुळे आगीने काही मिनिटांतच रौद्ररूप धारण केल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात येत आहे. नर्मदाबाई लासुरकर (वय ८५) असे मृत महिलेचे नाव आहे.
नर्मदाबाई लासुरकर या अशोकनगर परिसरातील रोकडे यांच्या वाड्यात वास्तव्यास होत्या. काही दिवसांपूर्वीच त्यांच्या वृद्ध भावाचे निधन झाल्याने त्या घरात एकट्याच राहत असल्याची माहिती समोर आली आहे. मंगळवारी दुपारी सुमारे दोन वाजेच्या सुमारास शहरात तापमान ४४ अंशांच्या आसपास असताना अचानक त्यांच्या घरातून धूर आणि आगीचे लोट बाहेर येऊ लागले. परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली; मात्र आग अतिशय वेगाने पसरल्याने ती स्वयंपाकघरापर्यंत पोहोचली. त्यानंतर उष्णतेमुळे घरातील गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट झाला. स्फोट इतका तीव्र होता की, नर्मदाबाई यांना घराबाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळू शकली नाही. परिणामी त्या घरातच अडकून होरपळल्या आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मलकापूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश गिरी यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाला पाचारण करून आग नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न करण्यात आले. दुर्घटनेनंतर परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृत महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मलकापूर उपजिल्हा रुग्णालयात हलविला आहे. दरम्यान, सिलिंडर स्फोटाच्या पार्श्वभूमीवर इंडेन गॅस एजन्सीचे संचालक मनीष लखानी यांनीही घटनास्थळी भेट देऊन तांत्रिक बाबींविषयी पोलिसांना माहिती दिली. या घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस अधिक तपास करीत आहेत. एकाकी जीवन जगणाऱ्या वृद्ध महिलेचा झालेला दुर्दैवी अंतामुळे अशोकनगर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

