Bhagwan Salve : आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना तातडीने मदत मिळावी तसेच प्रकरणांमधील विलंब कमी व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने जिल्हास्तरीय समितीचे पुनर्गठन करून तालुकास्तरीय समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या समितीवर मलकापूर पांगरा येथील पत्रकार भगवान साळवे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.

फकीरा पठाण
मलकापूर पांग्रा : आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना तातडीने मदत मिळावी तसेच प्रकरणांमधील विलंब कमी व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाने जिल्हास्तरीय समितीचे पुनर्गठन करून तालुकास्तरीय समित्या स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. या नव्या समितीवर मलकापूर पांगरा येथील पत्रकार भगवान साळवे यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागामार्फत आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत, सामाजिक सुरक्षा तसेच विविध शासकीय योजनांचा लाभ तातडीने मिळवून देण्यासाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर या समित्या कार्यरत राहणार आहेत.यापूर्वी शेतकरी कुटुंबांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून मदत दिली जात होती. मात्र आता नियमित अर्थसंकल्पातून निधी उपलब्ध करून मदत देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. तसेच अभ्यास समितीच्या शिफारशीनुसार मदत प्रक्रियेमधील विलंब टाळण्यासाठी समितीच्या संरचनेत बदल करण्यात आले आहेत.
तालुकास्तरीय समितीमध्ये उपविभागीय अधिकारी (एसडीएम) हे अध्यक्ष असतील, तर तहसीलदार सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत. याशिवाय गटविकास अधिकारी, पोलीस निरीक्षक, तालुका वैद्यकीय अधिकारी, आरोग्य अधिकारी, सहायक निबंधक सहकारी संस्था, अग्रणी बँक प्रतिनिधी, पशुसंवर्धन अधिकारी, शेतकरी प्रतिनिधी तसेच सामाजिक संस्थांच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे.पत्रकार भगवान साळवे यांची समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती झाल्यानंतर सिंदखेडराजा तालुक्यातील शेतकरी, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. शेतकरी आत्महत्या प्रकरणांमध्ये तातडीने मदत, समन्वय आणि प्रभावी पाठपुरावा करण्यासाठी ही समिती महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे मत व्यक्त होत आहे. दरम्यान, या नियुक्तीचे श्रेय भगवान साळवे यांनी मनोज कायंदे तसेच नितीन कायंदे यांना दिले आहे.

