Mahabreaking

[breaking_news]

Generator Down :जनरेटर बंद, वीजपुरवठा खंडित;  तहसील कार्यालयात नागरिकांची तारांबळ

Generator Down : मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील तहसील कार्यालयातील भोंगळ कारभारामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र समोर आले आहे. वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, अनेक वर्षांपासून बंद असलेली जनरेटर व्यवस्था आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती यामुळे तहसील कार्यालयाचा कारभार अक्षरशः रामभरोसे सुरू असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Generator Down

तहसीलदार दौऱ्यावर, कर्मचारी बेफिकीर; सिंदखेडराजा तहसील कार्यालयावर प्रश्नचिन्ह

अशोक इंगळे

सिंदखेडराजा : मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील तहसील कार्यालयातील भोंगळ कारभारामुळे सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचे चित्र समोर आले आहे. वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा, अनेक वर्षांपासून बंद असलेली जनरेटर व्यवस्था आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती यामुळे तहसील कार्यालयाचा कारभार अक्षरशः रामभरोसे सुरू असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

सिंदखेडराजा तालुका पाच जिल्हा परिषद गट आणि सात महसूल मंडळांमध्ये विभागलेला आहे. साखरखेर्डा, शेंदुर्जन आणि मलकापूर पांग्रा ही मंडळे तालुक्यापासून दूर अंतरावर असल्याने नागरिकांना तहसील कार्यालयात कामासाठी मोठा प्रवास करावा लागतो. मात्र, कार्यालयात आल्यानंतर “साहेब दौऱ्यावर आहेत”, “वीज नाही”, “नेटवर्क बंद आहे” अशी उत्तरे मिळत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे.

विशेषतः पुरवठा विभागातील कामकाजाबाबत नागरिकांनी गंभीर आरोप केले आहेत. रेशन योजनेतील नावे कमी करणे किंवा नवीन नावे समाविष्ट करणे यासाठी अनेक वर्षे अर्ज प्रलंबित राहत असल्याचे सांगण्यात येत आहे. “अर्थपूर्ण व्यवहार” झाल्याशिवाय काम होत नसल्याचा आरोप काही नागरिकांनी केला आहे.

उन्हाची तीव्रता वाढत असताना नागरिक आपल्या कामासाठी तहसील कार्यालयाच्या वारंवार फेऱ्या मारत आहेत. मात्र, कर्मचारी गैरहजर असणे, अधिकारी दौऱ्यावर जाणे आणि कार्यालयीन कामकाज ठप्प राहणे, यामुळे लोकांचा वेळ आणि पैसा वाया जात असल्याची भावना व्यक्त होत आहे.

दिवसभर वीज नसल्यामुळे संगणकीय कामकाज पूर्णपणे बंद पडले होते. त्यामुळे दूरवरून आलेल्या अनेक नागरिकांना कोणतेही काम न होता रिकाम्या हाताने परत जावे लागले. काही कर्मचारी कार्यालयाबाहेर चहा-पाण्याच्या निमित्ताने फिरत असल्याचेही नागरिकांनी निदर्शनास आणून दिले. पुरवठा विभाग, संजय गांधी निराधार विभाग आणि इतर कार्यालयांमध्येही अशीच परिस्थिती असल्याचे दिसून आले.

संजय गांधी निराधार विभागासमोर अनेक वृद्ध महिला ताटकळत बसलेल्या होत्या. त्यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था नसल्याने संताप व्यक्त करण्यात आला. तहसील कार्यालयाच्या मागील बाजूस उभारण्यात आलेले मोठे जनरेटर गेल्या तीन-चार वर्षांपासून बंद असल्याचे सांगण्यात येत आहे.

शासनाकडून लाखो रुपये खर्च करूनही जनरेटर दुरुस्त होत नसल्याने आणि वीज नसल्यामुळे शासकीय कामकाज ठप्प राहत असल्याने प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. रखडलेली जनतेची कामे मार्गी लागणार का, जनरेटर सुरू होणार का, याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top