Need information :ग्राहकांना वीज सेवांची माहिती तत्काळ उपलब्ध व्हावी यासाठी महावितरणने मोबाईल क्रमांक नोंदणी मोहिमेला गती दिली असून, अकोला परिमंडळातील तब्बल १३ लाख ६५ हजार ६६८ ग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंद महावितरणकडे केली आहे. नव्याने मोबाईल क्रमांक नोंदविणे किंवा पूर्वीचा क्रमांक अद्ययावत करण्यासाठी ग्राहकांनी महावितरणशी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी केले आहे.

अकोला परिमंडळातील १३.६५ लाख ग्राहकांची मोबाईल नोंदणी पूर्ण; वीजबिल, वीजपुरवठा बंद व दुरुस्तीची माहिती आता थेट मोबाईलवर
बुलढाणा : ग्राहकांना वीज सेवांची माहिती तत्काळ उपलब्ध व्हावी यासाठी महावितरणने मोबाईल क्रमांक नोंदणी मोहिमेला गती दिली असून, अकोला परिमंडळातील तब्बल १३ लाख ६५ हजार ६६८ ग्राहकांनी आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंद महावितरणकडे केली आहे. नव्याने मोबाईल क्रमांक नोंदविणे किंवा पूर्वीचा क्रमांक अद्ययावत करण्यासाठी ग्राहकांनी महावितरणशी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी केले आहे.
महावितरणकडून ग्राहकांना वीजबिल, वीजपुरवठा बंदचा कालावधी, तांत्रिक बिघाड, नियोजित देखभाल-दुरुस्ती, मीटर नोंद, बिल भरण्याची अंतिम तारीख तसेच बिल भरल्याची खात्री यासह विविध सेवा लघुसंदेशाद्वारे (एसएमएस) पुरविल्या जात आहेत. मात्र, अनेक ग्राहकांचे मोबाईल क्रमांक नोंदणीकृत नसल्याने किंवा जुने क्रमांक बदलले गेल्याने त्यांना या सुविधा मिळण्यात अडचणी येत आहेत.
अकोला परिमंडळातील एकूण १४ लाख ७२ हजार ५५० वीजग्राहकांपैकी ९२.७४ टक्के ग्राहकांनी मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली आहे. यामध्ये अकोला जिल्ह्यातील ४ लाख ८४ हजार ३११ ग्राहकांपैकी ४ लाख ५२ हजार ७१३, बुलढाणा जिल्ह्यातील ६ लाख ९८ हजार ३३३ ग्राहकांपैकी ६ लाख ४३ हजार, तर वाशिम जिल्ह्यातील २ लाख ९० हजार ग्राहकांपैकी २ लाख ७० हजार ग्राहकांनी आपले मोबाईल क्रमांक महावितरणकडे नोंदवले आहेत.अवकाळी पाऊस, वादळी वारे किंवा देखभाल-दुरुस्तीमुळे वीजपुरवठा खंडित झाल्यास त्याची माहिती ग्राहकांना वेळेवर मिळावी, यासाठी मोबाईल क्रमांक अद्ययावत असणे आवश्यक असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे.मोबाईल क्रमांक नोंदविण्यासाठी किंवा बदलण्यासाठी ग्राहकांनी १९१२, १८००-२१२-३४३५ आणि १८००-२३३-३४३५ या चोवीस तास सुरू असणाऱ्या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधावा. तसेच महावितरण संकेतस्थळ किंवा Mahavitaran अॅपच्या माध्यमातूनही नोंदणी करता येणार असल्याचे महावितरणने कळविले आहे.

