ST Bus Arrives : ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य लोकसेवेसाठी समर्पित केले, त्या व्यक्तीच्या रक्षा विसर्जन कार्यक्रमादरम्यानच एसटी बस गावात दाखल झाली आणि माजी सरपंच स्व. शिवाजी कायंदे मृत्यूनंतरही अपराजित ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

साखरखेर्डा : ज्यांनी आपले संपूर्ण आयुष्य लोकसेवेसाठी समर्पित केले, त्या व्यक्तीच्या रक्षा विसर्जन कार्यक्रमादरम्यानच एसटी बस गावात दाखल झाली आणि माजी सरपंच स्व. शिवाजी कायंदे मृत्यूनंतरही अपराजित ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
शेंदुर्जन, कंडारी, भंडारी, जागदरी, सायाळा, लिंगा, राजेगाव आणि दरेगाव परिसरातील जनतेच्या समस्या घेऊन केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या दरबारात सतत पाठपुरावा करणारे माजी सरपंच शिवाजी कायंदे हे जनतेसाठी झटणारे नेतृत्व म्हणून ओळखले जात होते. मामा बंद्रीभाऊ वाघ जिल्हा परिषद सदस्य असताना जनतेची कामे कशी करावीत आणि त्यासाठी सातत्याने पाठपुरावा कसा करावा, याचे धडे त्यांनी शिवाजी कायंदे यांना दिले होते. कंडारी गावचे सरपंच असताना त्यांनी ‘सरपंच’ ही बिरुदावली न लावता स्वतःला जनसेवक म्हणूनच ओळख दिली आणि पाच वर्षे प्रामाणिकपणे काम केले.
शेंदुर्जन ते खळेगाव रस्ता तसेच कंडारी गावाच्या पाणीप्रश्नासाठी त्यांनी कधीही राजकारण आड येऊ दिले नाही. जागदरी, कंडारी, भंडारी आणि खळेगाव ही गावे सिंदखेडराजा व मेहकर मतदारसंघाच्या सीमेवर असल्याने या भागाकडे लोकप्रतिनिधींचे अनेकदा दुर्लक्ष होत असे. मात्र, या गावांच्या समस्या शासनदरबारी पोहोचवण्यासाठी त्यांनी माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे, माजी आमदार तोताराम कायंदे, माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर तसेच केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला.
संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना तसेच महिलांच्या तहसील कार्यालयातील विविध कामांसाठीही ते नेहमी प्रयत्नशील असत. कंडारी, भंडारी आणि जागदरी या गावांत एसटी बस सेवा सुरू व्हावी, यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आणि केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांना निवेदनही दिले. मात्र, बससेवा सुरू झाली नाही. त्यामुळे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी साखरखेर्डा पोलीस स्टेशनमध्ये रस्ता रोको आंदोलन करण्यासाठी त्यांनी निवेदन सादर केले होते. आंदोलनासाठी ५ मे ही तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र, नियतीने वेगळाच डाव साधला आणि ३ मे रोजी सकाळी शिवाजी कायंदे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. दरम्यान, ६ मे रोजी त्यांचा रक्षा विसर्जन कार्यक्रम सुरू असतानाच बुलढाणा-लोणार ही एसटी बस कंडारी गावात दाखल झाली. केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी स्व. शिवाजी कायंदे यांचे स्वप्न पूर्ण केल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.यावेळी प्रतापराव जाधव, डॉ. शशिकांत खेडेकर, रंगनाथ डोईफोडे, बंद्रीभाऊ वाघ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. जनतेसाठी आयुष्यभर धडपडणारे माजी सरपंच स्व. शिवाजी कायंदे यांना यावेळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

