Vipassana Camp :बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधत बोरगाव मंजू येथे एकदिवसीय विपश्यना ध्यान साधना शिबिर उत्साहात पार पडले. धम्म गिरी इगतपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि धम्म मंजुषा विपश्यना केंद्र बोरगाव मंजू यांच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

धम्म मंजुषा केंद्रात ध्यान साधनेचा जागर; शांत जीवनासाठी विपश्यनेचा संदेश
संजय तायडे
बोरगाव मंजू : बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधत बोरगाव मंजू येथे एकदिवसीय विपश्यना ध्यान साधना शिबिर उत्साहात पार पडले. धम्म गिरी इगतपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि धम्म मंजुषा विपश्यना केंद्र बोरगाव मंजू यांच्या वतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
नवनिर्माणाधीन भव्य धम्म हॉलमध्ये आयोजित या शिबिराला साधक-साधिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सुमारे १२५ साधकांनी या एकदिवसीय शिबिरात सहभाग नोंदवला. सध्याच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक शांतता आणि तणावमुक्त जीवन जगण्यासाठी विपश्यना ध्यान उपयुक्त ठरत असल्याचा संदेश या शिबिरातून देण्यात आला.
१ मे रोजी सायंकाळी शिबिराला प्रारंभ झाला असून, रात्रीच्या सत्रात ध्यान साधनेचे विविध टप्पे पार पडले. २ मे रोजी सकाळी ‘मंगल मैत्री’सह शिबिराची सांगता करण्यात आली. संपूर्ण शिबिर शिस्तबद्ध आणि शांत वातावरणात पार पडले.
या शिबिराचे मार्गदर्शन पू. सहाय्यक आचार्य उषा तायडे, पू. आचार्य वाकोडे, पू. आचार्य झुनझूनवाला तसेच पू. आचार्य रवींद्र पोद्दार यांनी केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली साधकांनी ध्यान साधनेचा अनुभव घेतला. धम्म मंजुषा विपश्यना केंद्रात वर्षभर विविध ध्यान शिबिरे आयोजित केली जातात. नव्याने उभारण्यात येत असलेला धम्म हॉल भविष्यात अधिकाधिक साधकांना ध्यान साधनेसाठी उपलब्ध होणार असल्याचे आयोजकांनी सांगितले.
विपश्यना ही केवळ ध्यान पद्धती नसून जीवन जगण्याची एक कला आहे. तणावग्रस्त आणि वेगवान जीवनशैलीत मानसिक स्थैर्य मिळवण्यासाठी अशा शिबिरांची गरज वाढत असल्याचे आयोजकांनी नमूद केले. अधिकाधिक नागरिकांनी या साधनेत सहभागी होऊन मानसिक आरोग्य जपावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

