Driver Dozes Off : चालकला आलेल्या झोपेच्या डुलकीमुळे भरधाव मालवाहु वाहन डिव्हायडरवर धडकल्याची घटना समृद्धी महामार्गावर गुरुवारी सकाळी घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही.

भरधाव महिंद्रा पिकअप डिव्हायडरवर धडकला
फकीरा पठाण
मलकापूर पांग्रा : चालकला आलेल्या झोपेच्या डुलकीमुळे भरधाव मालवाहु वाहन डिव्हायडरवर धडकल्याची घटना समृद्धी महामार्गावर गुरुवारी सकाळी घडली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही.
प्राप्त माहितीनुसार, २३ एप्रिल २०२६ रोजी सकाळी सुमारे ६.३० वाजताच्या सुमारास मुंबई कॉरिडॉरवरील चॅनल क्रमांक २९०.२०० येथे हा अपघात झाला. पुसद (जि. यवतमाळ) येथून नाशिककडे निघालेल्या महिंद्रा पिकअप (क्र. MH 30 BD 3230) वाहनाचा चालक विठ्ठल बंडू गरोळे (वय २५) यांना प्रवासादरम्यान अचानक झोपेची डुलकी लागली. त्यामुळे, त्यांचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि वाहन रस्त्याच्या बाजूच्या डिव्हायडरवर आदळले.
घटनेची माहिती नियंत्रण कक्ष, छत्रपती संभाजीनगर येथून सकाळी ७.०८ वाजता मिळताच एपीआय इंगळे यांच्या नेतृत्वाखालील पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. यामध्ये पोलीस कर्मचारी तसेच एमएसएफचे दोन जवान सहभागी यांच्या पथकाने तात्काळ परिस्थिती नियंत्रणात घेत वाहनाला सुरक्षित बॅरिकेटिंग करून वाहतूक सुरळीत ठेवली.
अपघातात वाहनाचे किरकोळ नुकसान झाले असले तरी चालक सुरक्षित असल्याने मोठा अनर्थ टळल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सकाळच्या वेळेत वाहनांची वर्दळ असताना हा अपघात घडल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांच्या तत्परतेमुळे परिस्थिती लवकरच नियंत्रणात आली.
दरम्यान, दीर्घ पल्ल्याच्या प्रवासादरम्यान चालकांनी विश्रांती घेणे अत्यावश्यक असल्याचे प्रशासनाने पुन्हा अधोरेखित केले आहे. समृद्धी महामार्गासारख्या वेगवान मार्गावर झोपेच्या डुलकीमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी वाहनचालकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

