Uddhav Sena Opposes : महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने पुन्हा एकदा अकोलेकरांवर ६०० रुपयांचा आर्थिक भार लादल्याचा आरोप करीत उद्धवसेनेचे शहरप्रमुख आशिष गावंडे यांनी मालमत्ता करामध्ये समाविष्ट करण्यात आलेले कचरा संकलनाचे ६०० रुपये शुल्क तात्काळ रद्द करण्याची मागणी केली. भाजपने सभागृहात मंजूर केलेला ठराव विखंडनासाठी शासनाकडे पाठवावा, अशी मागणी निवेदनाद्वारे महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्याकडे बुधवार २२ एप्रिल रोजी करण्यात आली आहे.

नागरिकांना आर्थिक भुर्दंड बसणार असल्याचा आरोप : शहर प्रमुख आशीष गावंडे यांच्या नेतृत्वात आयुक्तांना निवेदन
अकोला: महापालिकेतील सत्ताधारी भाजपाने पुन्हा एकदा अकोलेकरांवर ६०० रुपयांचा आर्थिक भार लादल्याचा आरोप करीत उद्धवसेनेचे शहरप्रमुख आशिष गावंडे यांनी मालमत्ता करामध्ये समाविष्ट करण्यात आलेले कचरा संकलनाचे ६०० रुपये शुल्क तात्काळ रद्द करण्याची मागणी केली. भाजपने सभागृहात मंजूर केलेला ठराव विखंडनासाठी शासनाकडे पाठवावा, अशी मागणी निवेदनाद्वारे महापालिका आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्याकडे बुधवार २२ एप्रिल रोजी करण्यात आली आहे.

या संदर्भात उद्धवसेनेच्या शिष्टमंडळाने मनपा आयुक्त डॉ. सुनील लहाने यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली. यापूर्वी सन २०१७ मध्ये मनपा प्रशासनाने मालमत्ता करात मोठ्या प्रमाणावर दरवाढ केली होती. त्या वाढीचा आर्थिक फटका शहरवासी अद्यापही सहन करत असताना आता पुन्हा कचरा संकलनाच्या नावाखाली ६०० रुपयांचे अतिरिक्त शुल्क लादणे म्हणजे सर्वसामान्य नागरिक आणि झोपडपट्टी भागातील गरीब कुटुंबांची आर्थिक पिळवणूकच असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले. १३ एप्रिल २०२६ रोजी महापालिकेच्या विशेष सर्वसाधारण सभेत सत्ताधारी भाजपने मालमत्ता करामध्ये कचरा संकलनासाठी ६०० रुपये शुल्क समाविष्ट करण्याचा प्रस्ताव मंजूर करून नागरिकांवर अन्याय केला आहे. हा ठराव तातडीने विखंडनासाठी शासनाकडे पाठवावा, अशी ठाम मागणी मनपा आयुक्तांकडे करण्यात आली. यावेळी उपजिल्हाप्रमुख तथा नगरसेवक शंकर लंगोटे, शहरप्रमुख राहुल कराळे, मनपा गटनेता विजय इंगळे, नगरसेवक अभय खुमकर, निवासी उपजिल्हाप्रमुख अतुल पवनीकर, शहर संघटक अनिल परचुरे, उपशहर प्रमुख अभिषेक खरसाडे, योगेश गोतमारे, सोनू औतकार, प्रवीण शिंदे, हर्षल पाटील, उपशहर संघटक कमलेश कांबळे, उपविभाग प्रमुख दत्ता बाविस्कर, रामभाऊ आमले पाटील, बाळू पाटील ढोले, गणेश देवर्षी, चैतन्य जव्हेरी, प्रमोद गायकवाड, डीगांबर देशमुख, सुरेंद्र अवघन, शशांक हुंडीवाले, मनीष लंगोटे, अक्षय लंगोटे, संजय भगत, विशाल धूळ, सुनील यमगवडी, स्वरूप इंगोले, मयंक गायकवाड, दीक्षांत भगत, यश राठोड, जय मोडक, प्रशांत यमगवळी, सोमू यमगवळी, अश्विन कपले, विशाल घरडे, राजेश वरोकार, गजानन पुंडकर, अभिजीत गोंडचवर, प्रसाद अंबलकर, रोहित वरोकार, कृष्णा तराळे, धीरज घरडे, दिपक माठे, आदित्य लव्हाळे, उज्वल काळणे, सचिन गावंडे, हरीश तायडे, सागर अत्तरकर, रोहन इंगळे, गोपाल बिल्लेवार आदी शिवसैनिक उपस्थित होते.
…तर जनआंदोलन उभारण्याचा इशारा
दरम्यान, मालमत्ता करामध्ये अतिरिक्त ६०० रुपये समाविष्ट करण्याचा निर्णय मागे घेतला गेला नाही, तर उद्धवसेनेच्या वतीने कायदेशीर लढा उभारण्यासोबतच जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
भाजपच्या मनमानी कारभाराचा निषेध
शहरप्रमुख आशिष गावंडे यांच्या नेतृत्वाखाली छेडण्यात आलेल्या आंदोलनामध्ये सर्वसामान्य अकोलेकरांना आर्थिक खाईत लोटणाऱ्या सत्ताधारी भाजपच्या मनमानी कारभाराचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला. यावेळी शिवसैनिकांच्या घोषणेमुळे महापालिकेचा परिसर दणाणून गेला होता.
पडीक वार्डात लाखोंची उधळण; तरीही अस्वच्छता
साफसफाईच्या नावाखाली ५१ पडीक वार्डांसाठी लाखो रुपयांची तरतूद केली असली तरीही साफसफाईच्या नावाने बोंब असल्याची माहिती आयुक्तांना देण्यात आली. पडीक वार्डात जागोजागी घाणीने तुंबलेल्या नाल्या, सर्व्हिस लाईन दिसून येतात. पडीक वार्डातील स्वच्छतेच्या कामांची तपासणी करण्याची मागणी उद्धवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

