Sivendrasinharaje Bhosale : करवंड महोत्सवाच्या माध्यमातून तब्बल ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा मिळाला. तसेच आजवर झाकोळल्या गेलेल्या महाराणी गुणवंताबाईंचा इतिहास उजेडात आणणारा हा महोत्सव ठरला, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.

करवंड महोत्सवाचे थाटात आयोजन; मान्यवरांची उपस्थिती, प्रतीकात्मक विवाह सोहळ्याने वेधले लक्ष
चिखली : करवंड महोत्सवाच्या माध्यमातून तब्बल ३७० वर्षांपूर्वीच्या इतिहासाला उजाळा मिळाला. तसेच आजवर झाकोळल्या गेलेल्या महाराणी गुणवंताबाईंचा इतिहास उजेडात आणणारा हा महोत्सव ठरला, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी गुणवंताबाई यांच्या विवाहाला ३७० वर्षे पूर्ण होत असल्याच्या स्मृतिदिनानिमित्त शिवछत्रपतींची सासुरवाडी करवंड येथे यंदा प्रथमच १५ एप्रिल रोजी ‘करवंड महोत्सव’ मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला छत्रपतींचे वंशज ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. अनिकेत निंबाळकर, स्वागताध्यक्षा आ. श्वेता महाले, आ. धीरज लिंगाडे, आ. संजय गायकवाड, आ. सिद्धार्थ खरात, आ. मनोज कायंदे, माजी आमदार रेखाताई खेडेकर, विजयराज शिंदे, मराठा सेवा संघाचे पुरुषोत्तम खेडेकर, मुख्यमंत्र्यांचे सचिव विद्याधर महाले, चिखली नगराध्यक्ष पंडितराव देशमुख, मेहकर नगराध्यक्ष गारोळे, इंगळे घराण्याचे वंशज हरीरूद्रप्रताप इंगळे, राजे विजयसिंह जाधव यांच्यासह सुधीर खांदे, शरद पाटील, विजय सवडे, समाधान वाघ, सुधीर पाटील, संग्राम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना ना. भोसले यांनी या भूमीचे छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वराज्याशी असलेले ऋणानुबंध अधोरेखित करताना राजमाता जिजाऊंच्या कार्याचा विशेष उल्लेख केला. “जिजाऊ नसत्या तर शिवराय घडले नसते आणि शिवराय नसते तर स्वराज्याची कल्पनाही साकार झाली नसती,” असे ते म्हणाले. दरम्यान, महाराणी गुणवंताबाई यांचे भव्य स्मारक उभारणे, बावन्नबुरुज आणि राजवाड्याच्या पुनरुज्जीवनासाठी शासन प्रयत्नशील राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तसेच छत्रपतींचा इतिहास कोणत्याही एका जाती-धर्मापुरता मर्यादित नसून तो संपूर्ण मराठी माणसाचा आहे. अठरापगड जाती आणि बारा बलुतेदार यांच्या एकत्रित परंपरेतून घडलेला मराठी माणूस हा या इतिहासाचा खरा वारसदार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, पूर्वी छत्रपतींचा इतिहास झाकोळण्याचे प्रयत्न झाले असले, तरी सध्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यातील मुख्यमंत्री फडणवीस यांच्या युती सरकारने तो व्यापक स्तरावर पुढे आणण्याचे काम केल्याचे त्यांनी नमूद केले.
करवंड महोत्सवाच्या स्वागताध्यक्षा आमदार श्वेता महाले यांनी महोत्सव शासनस्तरावर साजरा व्हावा यासाठी विधानसभेत सातत्याने पाठपुरावा केल्याची माहिती दिली. या प्रयत्नांची पार्श्वभूमी तसेच प्रत्यक्ष सोहळ्याच्या अंमलबजावणीपर्यंतचा आढावा त्यांनी आपल्या भाषणात मांडला. दरम्यान, करवंड येथे महाराणी गुणवंताबाई यांचे भव्य स्मारक उभारणे, ऐतिहासिक बावन्नबुरुज व राजवाड्याचे पुनरुज्जीवन करण्याची मागणी केली. तसेच मतदारसंघातील रस्ते व विविध विकासकामांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्याकडे व्यक्त केली.

शिवराय व गुणवंताबाई यांच्या प्रतीकात्मक विवाहाने वेधले लक्ष
या सोहळ्यात इतिहासाची जिवंत पुनर्निर्मिती अनुभवायला मिळाली. छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणी गुणवंताबाई यांच्या विवाह सोहळ्याचे प्रतीकात्मक सादरीकरण करण्यात आल्याने उपस्थितांना तब्बल ३७० वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक क्षणाची अनुभूती आली. या भव्य सोहळ्याद्वारे स्वराज्यकालीन परंपरा, संस्कृती आणि वैभव पुन्हा एकदा जिवंत झाले. विशेष म्हणजे इतिहासात काहीसा झाकोळल्या गेलेल्या महाराणी गुणवंताबाई यांच्या कार्याचा आणि योगदानाचा यानिमित्ताने उजाळा मिळाला. पारंपारिक वाद्य, सनई-चौघड्याचा निनाद, शिवकालीन वेशभूषा, जुन्या पद्धतीचा बाज अशा पद्धतीने शिवरायांची प्रतीकात्मक वरात निघाल्यानंतर गुणवंताबाईंशी विवाह आदी विधींमुळे संपूर्ण परिसरात ऐतिहासिक वातावरण निर्माण झाले होते. कार्यक्रमात स्वराज्यातील गुणवंताबाईंसह सईबाई या दोन महाराणींचे वंशज उपस्थित राहिल्याने सोहळ्याचे महत्त्व अधिक अधोरेखित झाले.

