Lonar Municipality: लोणार नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीत नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला वर्गासाठी राखीव निघाले असून, लोणार नगरपालिकेवर पुन्हा एकदा “महिला सत्तेचा अध्याय” लिहिला जाणार आहे. या निकालानंतर शहराच्या राजकीय वातावरणात मोठी हालचाल सुरू झाली असून सर्वच प्रमुख पक्षांनी संभाव्य महिला उमेदवारांच्या शोधाला वेग दिला आहे.

लोणार : लोणार नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या आरक्षण सोडतीत नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला वर्गासाठी राखीव निघाले असून, लोणार नगरपालिकेवर पुन्हा एकदा “महिला सत्तेचा अध्याय” लिहिला जाणार आहे. या निकालानंतर शहराच्या राजकीय वातावरणात मोठी हालचाल सुरू झाली असून सर्वच प्रमुख पक्षांनी संभाव्य महिला उमेदवारांच्या शोधाला वेग दिला आहे.
गत निवडणुकीत नगराध्यक्षपद अनुसूचित जाती (महिला) वर्गासाठी राखीव होते. त्या आरक्षणातून काँग्रेसच्या पूनम पाटोळे थेट जनतेतून निवडून आल्या होत्या. आता पुन्हा एकदा हे पद खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव ठरल्याने महिलांच्या नेतृत्वाचा वारसा कायम राहणार आहे.लोणार नगरपालिकेच्या इतिहासात सौ. लताबाई प्रेमचंद कोचर (2004) या थेट जनतेतून निवडल्या गेलेल्या पहिल्या महिला नगराध्यक्षा ठरल्या होत्या. त्यानंतर रंजना मापारी, स्व. मनकर्णाबाई पाटोळे, सौ. सुशीला जाधव आणि सौ. पूनम पाटोळे अशा एकूण पाच महिलांनी नगराध्यक्षपद भूषविले आहे.आता पुन्हा सर्वसाधारण महिला आरक्षण लागू झाल्याने लोणार शहरात महिलांचे नेतृत्व कायम राहणार आहे.
महिला उमेदवारांमध्ये उत्साह
आरक्षण जाहीर झाल्यापासून शहरातील महिला कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे. गेल्या काही महिन्यांपासून निवडणुकीची तयारी करणाऱ्या अनेक महिला आता सक्रिय झाल्या आहेत. राजकीय पक्ष, समाजसेविका आणि नव्या चेहऱ्यांमधून महिलांच्या उमेदवारीबाबत जोरदार चर्चा सुरू आहे.
सर्व पक्षांत हालचालींना वेग
आरक्षण सोडतीनंतर सर्व प्रमुख पक्षांनी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), शिवसेना (एकनाथ शिंदे गट), शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), एमआयएम तसेच स्थानिक अपक्ष गट या सर्वांनी संभाव्य महिला उमेदवारांच्या नावांवर चर्चा सुरू केली आहे. स्थानिक राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार, काही पक्षांनी तर संभाव्य उमेदवारांची यादीही तयार केली आहे. या वेळी महिला मतदारांचा मोठा प्रभाव राहणार असल्याने प्रत्येक पक्ष आपल्या प्रचारात महिलांना अग्रभागी ठेवणार आहे.
“दिवाळीपूर्वीची गोड बातमी”
आरक्षण सोडतीची घोषणा दिवाळीच्या तोंडावर झाल्याने शहरात एकप्रकारे ‘राजकीय दिवाळीचा फराळ गोड’ झाल्याची भावना व्यक्त होत आहे. इच्छुक महिला उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण असून, अनेकांनी “हीच वेळ महिलांच्या नेतृत्वाला नवी दिशा देणारी ठरू दे” या घोषवाक्यासह तयारीला सुरुवात केली आहे.
गतवेळचे समीकरण आणि यंदाचा बदल
मागील कार्यकाळात पूनम पाटोळे यांनी अनुसूचित जाती (महिला) आरक्षणातून नगराध्यक्षा म्हणून काम करताना विकास प्रकल्प, प्रशासनाशी समन्वय आणि नागरी समस्यांवर कामगिरी केली.
या वेळी सर्वसाधारण महिला आरक्षण आल्याने राजकीयच नव्हे तर सामाजिक क्षेत्रातील सक्रिय महिलांनाही मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
प्रत्येक पक्षात दावेदारांची संख्या जास्त
शहरात प्रत्येकच पक्षात नगराध्यक्षपदासाठी दावेदारांची संख्या माेठी आहे. यामध्ये काॅंग्रेस पक्षात रंजना राजेश मापारी, मीना भूषण मापारी, निर्मला शांतीलाल गुगलिया, सरला रामचंद्र कोचर तसेच शिवसेना (शिंदे गट) डॉ. सुनीता बळीराम मापारी, संगीता संतोष मापारी, आंचल सुबोध संचेती, वर्षा आशिष रुणवाल,माजी नगराध्यक्ष खान माेमीन खान यांच्या पत्नी जयबुनीसा खान माेमीन खान शिवसेना (उद्धव ठाकरे गट) सिंधुताई गजानन जाधव तसेच वंचित बहुजन आघाडी, भाजप, एमआयएम आणि काही अपक्ष गटातील महिला सुद्धा इच्छुक असल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रत्यक्ष उमेदवारी निश्चित करताना पक्षश्रेष्ठींवर लॉबिंग आणि अंतर्गत समीकरणे महत्त्वाची ठरणार आहेत.
नव्या समीकरणांकडे साऱ्यांचे लक्ष
नगराध्यक्षपदाच्या आरक्षणानंतर आता प्रभागनिहाय आरक्षण आणि प्रारूप मतदार याद्या (दि. ८ ऑक्टोबर) जाहीर होणार असून, त्यानंतर प्रत्येक प्रभागातील राजकीय गणित नव्याने मांडले जाईल.शहरातील नागरिक या आरक्षणाचे स्वागत करत असून, “महिलांच्या नेतृत्वात लोणार शहराने प्रत्येक वेळेस प्रगती केली आहे; पुन्हा महिला नगराध्यक्षा आल्यास शहराच्या विकासाला गती मिळेल,” असे नागरिकांचे मत आहे.

