Matang Communitys Clarion Call :शहरातील रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या सौंदर्यकरणासाठी मातंग समाजाने पुन्हा एकदा जोरदार मागणी केली आहे. यासंदर्भात साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे स्मारक समिती, खामगाव यांच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.

सौंदर्यकरण व नामांतरासाठी आंदोलन; 24 मार्चपासून साखळी उपोषण
खामगाव : शहरातील रेल्वे स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेल्या साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याच्या सौंदर्यकरणासाठी मातंग समाजाने पुन्हा एकदा जोरदार मागणी केली आहे. यासंदर्भात साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे स्मारक समिती, खामगाव यांच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.
निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, पुतळ्याच्या परिसराचे सुशोभीकरण करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून नगरपरिषद व प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात येत आहे. मात्र, अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नाही. त्यामुळे समाजाच्या भावना दुखावल्या जात असून प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप समितीने केला आहे.
समितीने शासनाकडे पुतळ्याचे शासकीय निधीतून तात्काळ सौंदर्यकरण करण्याची तसेच पुतळ्यालगत उभारण्यात येणाऱ्या व्यापारी संकुलास “डॉ. अण्णाभाऊ साठे व्यापारी संकुल” असे नाव देण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, या मागण्यांसाठी 24 मार्चपासून साखळी उपोषण सुरू करण्यात येणार असल्याची माहिती समितीने दिली आहे. यासंदर्भात नगरपरिषद खामगावचे मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले असून, रेल्वे स्टेशन गेटलगत पुतळा परिसरात उपोषण छावणी उभारण्याची परवानगी मागण्यात आली आहे.
समितीच्या वतीने जाळी कंपाऊंडजवळ तात्पुरता पाईप पॅंडॉल उभारून आंदोलन करण्यात येणार असून, शेकडो समाजबांधव रात्रंदिवस या साखळी उपोषणात सहभागी होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशाराही समितीने दिला असून, उद्भवणाऱ्या परिस्थितीस प्रशासन जबाबदार राहील, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर परिमल कांबळे, आशिष सावळे, संभाजी शिंदे, कृष्णा नाटेकर, आशिष खंडारे, गोपाल वानखडे, सुरेश बोरकर, गजानन सोनोने आदींसह इतरांची स्वाक्षरी आहे.

