High-Level Inspection :महाराष्ट्र शासनाच्या ‘समृद्ध ग्रामपंचायत’ अभियानांतर्गत अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांनी पातूर तालुक्यातील बेलुरा बु. ग्रामपंचायतीला भेट देत गावातील विकासकामांचा आढावा घेतला. या पाहणीनंतर त्यांनी समाधान व्यक्त करत ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले.

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट; लोकसहभागातून विकासाची नवी दिशा
राहुल सोनोने
दिग्रस बु. : महाराष्ट्र शासनाच्या ‘समृद्ध ग्रामपंचायत’ अभियानांतर्गत अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांनी पातूर तालुक्यातील बेलुरा बु. ग्रामपंचायतीला भेट देत गावातील विकासकामांचा आढावा घेतला. या पाहणीनंतर त्यांनी समाधान व्यक्त करत ग्रामपंचायतीच्या कार्यपद्धतीचे कौतुक केले.
या दौऱ्यात गावातील विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. सरपंच राजेश भाकरे, ग्रामपंचायत अधिकारी नारायण घुगे तसेच सदस्यांच्या कामकाजाची दखल घेत, नियोजनबद्ध अंमलबजावणी आणि पारदर्शक कारभाराचे विशेष कौतुक करण्यात आले.
यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी हृनारायणसिंह परिहार, पातूरचे गट विकास अधिकारी सतीश नायसे यांचीही उपस्थिती होती. पथकाने जलसंधारण, स्वच्छता अभियान, तसेच ‘समृद्ध ग्रामपंचायत’ अंतर्गत सुरू असलेल्या विविध योजनांची बारकाईने पाहणी केली.
गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सुधारणा, नियोजन आणि प्रशासनाच्या भूमिकेबाबत मार्गदर्शन करताना, “लोकसहभाग आणि प्रशासन यांचे समन्वयातून गावाचा सर्वांगीण विकास साधता येतो,” असे मत अनिता मेश्राम यांनी व्यक्त केले.
बेलुरा बु. ग्रामपंचायत तालुक्यात ‘रोल मॉडेल’ ठरण्याच्या दिशेने वाटचाल करत असून, यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला. या प्रसंगी उपसरपंच दुतोंडे, ग्राम रोजगार सेवक श्रीकृष्ण इंगळे, ग्रामपंचायत सदस्य, अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी, मुख्याध्यापक अंधारे तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या या भेटीमुळे गावातील विकासकामांना अधिक गती मिळणार असल्याचे चित्र आहे.

