Mahabreaking

[breaking_news]

Process Cancelled :सरकारी दर जाहीर होताच मलकापूर पांगऱ्यात लिलावात गदारोळ; प्रक्रिया रद्द

Process Cancelled :आठवडी बाजाराच्या लिलावात शासकीय दर आणि नियमावली जाहीर होताच मलकापूर पांग्रा येथे अक्षरशः गदारोळ उडाला. व्यापारी वर्ग आणि इच्छुक लिलावधारकांनी तीव्र आक्षेप घेतल्याने अखेर प्रशासनाला लिलाव प्रक्रिया रद्द करावी लागली. या घटनेमुळे स्थानिक प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Process Cancelled

आठवडी बाजार लिलावात व्यापाऱ्यांचा संताप; अवाजवी दरांवरून तणाव

फकीरा पठाण

मलकापूर पांग्रा : आठवडी बाजाराच्या लिलावात शासकीय दर आणि नियमावली जाहीर होताच मलकापूर पांग्रा येथे अक्षरशः गदारोळ उडाला. व्यापारी वर्ग आणि इच्छुक लिलावधारकांनी तीव्र आक्षेप घेतल्याने अखेर प्रशासनाला लिलाव प्रक्रिया रद्द करावी लागली. या घटनेमुळे स्थानिक प्रशासनाच्या नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Process Cancelled

ग्रामसचिवालयात २० मार्च रोजी दुपारी आयोजित करण्यात आलेल्या या लिलावात ग्रामविकास अधिकारी आणि विस्तार अधिकाऱ्यांनी आठवडी बाजाराच्या वसुलीचे शासकीय दर आणि नियम स्पष्ट केले. प्रति दुकानदार २५ ते ४० रुपये वसुली बंधनकारक असल्याचे सांगण्यात येताच उपस्थित व्यापाऱ्यांमध्ये संताप उसळला.

मलकापूर पांग्रा येथील आठवडी बाजार हा जिल्ह्यातील महत्त्वाचा बाजार मानला जातो. मागील वर्षी हा लिलाव तब्बल ६ लाख ६८ हजार रुपयांत झाला होता. यंदा शासनाने सुमारे ५ लाख ७० हजार रुपयांची आधारभूत किंमत निश्चित केली होती. मात्र, “लाखो रुपयांचा लिलाव घेऊनही वसुली करताना मनमानी होते आणि शासकीय नियम पाळले जात नाहीत,” असा आरोप व्यापाऱ्यांनी करत लिलाव रद्द करण्याची मागणी लावून धरली.

व्यापाऱ्यांनी स्पष्टपणे सांगितले की, लिलावधारकांकडून गोरगरीब दुकानदारांकडून अतिरिक्त पैसे वसूल केले जातात, पावत्या दिल्या जात नाहीत आणि बाजारात कोणतीही शिस्त राखली जात नाही. यामुळे अनेक विक्रेते बाजार सोडून रस्त्यावर बसतात, परिणामी अपघातांचा धोका वाढतो. “सरकारी दर कमी करून पारदर्शक वसुली करावी,” अशी ठाम मागणी करण्यात आली.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाने लिलाव स्थगित करण्याचा निर्णय घेतला. यावेळी विस्तार अधिकारी राजेश्वर पवार, ग्रामविकास अधिकारी उद्धव गायकवाड, सरपंच पती यादव टाले, सदस्य नामदेव उगले यांच्यासह व्यापारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान, ग्रामविकास अधिकारी उद्धव गायकवाड यांनी स्पष्ट केले की, “मागील तीन वर्षांच्या लिलाव रकमेच्या आधारे शासकीय किंमत निश्चित केली जाते. जर ही किंमत मान्य झाली नाही आणि लिलाव वारंवार रद्द झाला, तर नियमानुसार ग्रामपंचायतीलाच बाजाराची वसुली करावी लागेल.”

तसेच ग्रामपंचायत सदस्य नामदेव उगले यांनी बाजार व्यवस्थेतील त्रुटींवर बोट ठेवत, “दुकानांची मांडणी, स्वच्छता, जागेचे नियोजन आणि पारदर्शक वसुली यासाठी ठोस धोरण राबवणे आवश्यक आहे,” असे मत व्यक्त केले. या सर्व घडामोडींमुळे मलकापूर पांग्रा येथील आठवडी बाजाराचा प्रश्न अधिकच तापला असून, पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top