farmers face a crisis :तालुक्यात बे-मोसमी अवकाळी पावसाने हाहाकार माजवला असून, रब्बी हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण होते. काढणीस आलेल्या पिकांची काढणी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असतानाच दिनांक १९ च्या रात्री सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. यासोबत गारपीटही झाली. तुळजापूरसह महसूल मंडळात या पावसाचे प्रमाण अधिक होते. काढणीस आलेल्या रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अवकाळीचा कहर; देऊळगाव राजा तालुक्यात रब्बी पिकांचा चुराडा
गजानन तिडके
देऊळगाव राजा : तालुक्यात बे-मोसमी अवकाळी पावसाने हाहाकार माजवला असून, रब्बी हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यात ढगाळ वातावरण होते. काढणीस आलेल्या पिकांची काढणी करण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू असतानाच दिनांक १९ च्या रात्री सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. यासोबत गारपीटही झाली. तुळजापूरसह महसूल मंडळात या पावसाचे प्रमाण अधिक होते. काढणीस आलेल्या रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

सविस्तर वृत्त असे की, यावर्षी पर्जन्यमान चांगले असल्यामुळे रब्बी पिके बहरात आली होती. मात्र काल रात्री अचानक सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस व गारपिटीला सुरुवात झाली. सुमारे दोन ते अडीच तास तुळजापूरसह महसूल मंडळाला या पावसाने झोडपून काढले. काही ठिकाणी गारांचे प्रमाणही जास्त होते.
या पावसामुळे काढणीस आलेली गहू, शाळू ज्वारी, मका, बाजरी आणि कांदा पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. काढणीस आलेले गहू पीक हातचे गेले असून, इतर पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. मका पीक जाग्यावर भिजल्याने ते शंभर टक्के निकामी झाले आहे. उन्हाळी बाजरीचीही तीच अवस्था झाली आहे.
आंब्याच्या बहरातील फळांची मोठ्या प्रमाणात झड झाली आहे. कांदा पिकाचेही नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विहिरीवरील सोलार पॅनल्स नेस्तनाबूत झाले आहेत. आंबा शेवटच्या टप्प्यात असताना अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे.
तुळजापूर महसूल मंडळात गारपिटीचे प्रमाण जास्त असून, काही ठिकाणी पिके शंभर टक्के नष्ट झाली आहेत. त्यामुळे महसूल विभागाने तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.

नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांनी तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांना निवेदन दिले आहे. निवेदनात गहू, ज्वारी, कांदा, बियाणे, आंबा व फळपिकांचे नुकसान झाल्याचे नमूद करून तात्काळ पंचनामा करण्याची मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावर दिनकर खरात, आकाश जाधव, लक्ष्मण कोल्हे, गजानन तिडके, बाबासाहेब कोल्हे, कारभारी कांबळे, राजेंद्र कोल्हे, विजय खरात, संतोष कोल्हे, गोपीकृष्ण पवार, अमोल शिंदे, श्रीकांत कोल्हे, सारंगधर मोरे, नितीन मंडपे, प्रदीप कोल्हे, विजय कोल्हे, नायब राव बोरुडे, रामदास कोल्हे, गुलाब कोल्हे, भाऊसाहेब कोल्हे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
दरम्यान, तहसीलदार वैशाली डोंगरजाळ यांनी सांगितले की, “तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीची माहिती घेतली जात आहे. तुळजापूर मंडळात याचे प्रमाण अधिक असल्याने नुकसानीचा सर्वे करण्याचे आदेश देण्यात आले असून सर्वे सुरू आहे. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आम्ही कटीबद्ध आहोत.”

