Two killed : तालुक्यात अवघ्या काही तासांच्या अंतरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांत दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून परिसरात शोककळा पसरली आहे.

निंबा फाट्यावर ट्रॅक्टरला दुचाकीची धडक; बाळापूर ते अकोला मार्गावर दोन दुचाकींची धडक
जाकीर अहमद
बाळापूर : तालुक्यात अवघ्या काही तासांच्या अंतरात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांत दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून परिसरात शोककळा पसरली आहे.
प्राप्त माहितीनुसार, १९ मार्च रोजी दुपारी सुमारे १२ वाजता निंबा फाटा येथील शिदोरी ढाब्यासमोर उभ्या असलेल्या ट्रॅक्टरला (एमएच ३० बीयू ०८७७) क्रमांकाच्या मोटारसायकलने जोरदार धडक दिली. या अपघातात डोंगरगाव येथील सुजल संतोष इंगळे या युवकाचा जागीच मृत्यू झाला. त्याच्यासोबत असलेला गणेश श्रीनाथ गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
दुसरी घटना सायंकाळी सुमारे ४.३० वाजता बाळापूर-अकोला मार्गावरील अंबुजा तेल कंपनीसमोर घडली. दोन मोटारसायकलींची समोरासमोर धडक झाल्याने बाळापूर येथील मोहम्मद हनीफ अब्दुल रशीद (वय ५६) हे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने अकोला येथे उपचारासाठी हलविण्यात येत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
सणाच्या दिवशी घडलेल्या या दुर्दैवी घटनांनी तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून, आनंदोत्सवावर विरजण पडले आहे. नागरिकांना या अपघातांनी हादरवून सोडले असून, रस्ते सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिसांनी दोन्ही घटनांची नोंद घेत पुढील तपास सुरू केला आहे.

