Mahabreaking

[breaking_news]

Hunger Strike :रेतीघाटावरील उपोषणाचा २० व्या दिवशी शेवट; तहसीलदारांच्या मध्यस्थीने तोडगा

Hunger Strike : खडकपूर्णा नदीवरील दुसरबीड येथील रेतीघाटावर सुरू असलेल्या उपोषणाची अखेर २० व्या दिवशी सांगता झाली. तहसीलदार अजित दिवटे यांच्या पुढाकाराने प्रशासन, उपोषणकर्ते आणि ग्रामस्थ यांच्यात झालेल्या चर्चेनंतर हा तोडगा निघाला.

Hunger Strike

दुसरबीड : खडकपूर्णा नदीवरील दुसरबीड येथील रेतीघाटावर सुरू असलेल्या उपोषणाची अखेर २० व्या दिवशी सांगता झाली. तहसीलदार अजित दिवटे यांच्या पुढाकाराने प्रशासन, उपोषणकर्ते आणि ग्रामस्थ यांच्यात झालेल्या चर्चेनंतर हा तोडगा निघाला.

सिंदखेडराजा तालुक्यातील खडकपूर्णा नदीवरील ऐतिहासिक पुलाजवळील दुसरबीड रेतीघाट शासनाने लिलावाद्वारे दिला होता. मात्र, शासनाच्या अटी-शर्तींचे उल्लंघन करून घाटावर नियमबाह्य पद्धतीने रेतीउपसा सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला होता. बोटींमार्फत आणि पोकलेन मशिनच्या साहाय्याने रात्रंदिवस रेती काढली जात असल्याची तक्रार करण्यात आली. तसेच मंजूर गट क्रमांकाऐवजी इतरच गटातून रेती उपसा होत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला. या संदर्भात घाटचालकाला वारंवार सूचना देऊनही त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. उलट दबाव तंत्राचा वापर करून स्थानिकांना गप्प बसवण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही करण्यात आला.

याबाबत महसूल विभागाकडे निवेदने व पत्रव्यवहार करूनही दखल घेतली जात नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारला. हे उपोषण तब्बल २० दिवस सुरू होते. दरम्यान, १७ मार्च रोजी दुपारी साडेचारच्या सुमारास तहसीलदार अजित दिवटे यांनी तढेगाव फाटा येथे प्रत्यक्ष भेट देत उपोषणकर्ते व गावातील नागरिकांसोबत सविस्तर चर्चा केली. या चर्चेत उपोषणकर्त्यांच्या काही प्रमुख मागण्या मान्य करण्यात आल्या. यानुसार, रेतीउपशासाठी पोकलेन मशिन व बोटींचा वापर बंद करण्यात येणार आहे. तसेच घाट सकाळी ६ ते सायंकाळी ६ या वेळेतच चालवण्यास परवानगी देण्यात येईल. विनानंबर वाहने वापरण्यास मनाई करण्यात आली असून, वाहनांच्या क्षमतेनुसारच रॉयल्टी आकारली जाणार आहे. तसेच मंजूर गटामधील रेतीचे मोजमाप करूनच उपसा करण्याचे निर्देश देण्यात आले. या निर्णयानंतर उपोषणकर्त्यांनी समाधान व्यक्त करत उपोषणाची सांगता केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top