Equestrian Statue of Shivrai : येथील नागरिकांचे अनेक वर्षांचे स्वप्न अखेर साकार झाले असून येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे मोठ्या उत्साहात अनावरण करण्यात आले. या वेळी पुतळ्याच्या परिसराच्या सुशोभीकरणासाठी २५ लाख रुपयांच्या निधीची घोषणा करण्यात आली.

डोणगाव :येथील नागरिकांचे अनेक वर्षांचे स्वप्न अखेर साकार झाले असून येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याचे मोठ्या उत्साहात अनावरण करण्यात आले. या वेळी पुतळ्याच्या परिसराच्या सुशोभीकरणासाठी २५ लाख रुपयांच्या निधीची घोषणा करण्यात आली.
डोणगावकरांना गावात शिवरायांचे स्मारक व्हावे, अशी अनेक दशकांपासून अपेक्षा होती. यासाठी विविध राजकीय नेते व सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले होते. दरम्यान, आठवडी बाजारातील मोकळ्या जागेत अज्ञात व्यक्तीकडून शिवरायांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात आला होता. त्यानंतर १२ मार्च रोजी या पुतळ्याचा विधीवत अनावरण सोहळा पार पडला.
या सोहळ्यावेळी युवासेना पदाधिकारी ऋषी प्रतापराव जाधव यांच्या हस्ते महारुद्राभिषेक व आरती करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवरायांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून औक्षण करण्यात आले. त्यानंतर पुष्पवृष्टी व आरती करण्यात आली. या वेळी उपस्थित नागरिकांनी “जय शिवराय”, “हर हर महादेव” अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून टाकला. या प्रसंगी बोलताना ऋषी जाधव यांनी केंद्रीय मंत्री व बुलढाणा जिल्ह्याचे खासदार प्रतापराव जाधव यांच्या वतीने शिवरायांच्या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी २५ लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली. या घोषणेचे उपस्थित युवक व नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत केले.
“छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार केवळ डोक्यावर न ठेवता डोक्यात घ्यावेत आणि त्यांच्या आदर्शांनुसार समाजकार्य करावे, हाच त्यांना खरा अभिवादनाचा मार्ग आहे,” असे मतही यावेळी व्यक्त करण्यात आले. या अनावरण सोहळ्यावेळी आकर्षक विद्युत रोषणाई, फटाक्यांची आतिषबाजी आणि ढोल-ताशांच्या गजरामुळे वातावरण उत्साहपूर्ण झाले होते. कार्यक्रमाला सरपंच शिवचरण आखाडे, माजी सरपंच संजय पाटील आखाडे, ॲड. रामेश्वर पळसकर तसेच परिसरातील महिला, पुरुष व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, या आनंदसोहळ्यात काही नागरिकांमध्ये अशीही चर्चा ऐकायला मिळाली की, डोणगावातील शासकीय नळयोजनेतून नियमित पाणीपुरवठा सुरू झाला, तर गावकऱ्यांना याहून अधिक आनंद मिळेल.
http://mahabreaking.com/wp-content/uploads/2026/08/ChatGPT-Image-Aug-30-2026-05_07_40-PM.png

