Mahabreaking

[breaking_news]

Lok Adalat :लोकन्यायालयात प्रकरणांचा झटपट निपटारा; मलकापूर पांग्रा परिसरातील वादांना सामोपचाराने पूर्णविराम

Lok Adalat :सिंदखेड राजा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकन्यायालयात मलकापूर पांग्रा व परिसरातील अनेक प्रलंबित प्रकरणांचा यशस्वी निपटारा करण्यात आला. या लोकन्यायालयाला तालुक्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या वादांवर सामोपचाराने पडदा टाकण्यात आला.

Lok Adalat
न्यायाधीश रामराजे मगर व अ‍ॅड. ऋषिकेश आटोळे यांच्या पॅनेलचा पुढाकार; जुगार व बँक वसुलीची प्रकरणे निकाली

फकीरा पठाण

मलकापूर पांग्रा : सिंदखेड राजा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात आयोजित राष्ट्रीय लोकन्यायालयात मलकापूर पांग्रा व परिसरातील अनेक प्रलंबित प्रकरणांचा यशस्वी निपटारा करण्यात आला. या लोकन्यायालयाला तालुक्यातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या वादांवर सामोपचाराने पडदा टाकण्यात आला.

या लोकन्यायालयाच्या कामकाजासाठी दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे न्यायाधीश रामराजे मगर तसेच क्रिमिनल लॉयर अ‍ॅड. ऋषिकेश आटोळे यांच्या विशेष पॅनेलची नियुक्ती करण्यात आली होती. पॅनेलने दोन्ही बाजूंच्या पक्षकारांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेत त्यांना कायद्याच्या चौकटीत राहून तडजोडीचे महत्त्व पटवून दिले. त्यांच्या प्रभावी मध्यस्थीमुळे अनेक जुने व गुंतागुंतीचे वाद मिटले.

सिंदखेड राजा तालुक्यातील ११३ गावांमधून मोठ्या संख्येने पक्षकार लोकन्यायालयात उपस्थित राहिले. यामध्ये मलकापूर पांग्रा व परिसरातील नागरिकांची उपस्थिती विशेष लक्षणीय होती. विशेषतः जुगार प्रतिबंधक कायद्याशी संबंधित अनेक फौजदारी प्रकरणे सामोपचाराने निकाली काढण्यात आली.

यासोबतच स्टेट बँक ऑफ इंडिया, मलकापूर पांग्रा शाखेच्या थकीत कर्ज वसुलीच्या प्रकरणांमध्येही बँक अधिकारी व खातेदार यांच्यात यशस्वी तडजोड घडवून आणण्यात आली. त्यामुळे अनेक खातेदारांना दिलासा मिळाला.

या प्रक्रियेत साखरखेडा, किनगाव राजा आणि सिंदखेड राजा पोलीस स्टेशनचे कर्मचारी, तसेच मलकापूर पांग्रा येथील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष आरीफ मलिक यांनी महत्त्वपूर्ण सहकार्य केले. यावेळी स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक, बँक कर्मचारी, अमोल देशमुख तसेच तालुक्यातील विविध गावांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकन्यायालयाच्या माध्यमातून न्यायालयीन खटल्यांच्या फेऱ्यातून सुटका झाल्याने मलकापूर पांग्रा परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले. लोकन्यायालयामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांची मोठ्या प्रमाणात बचत होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top