Underground sewerage scheme :शहरातील प्रभाग क्रमांक ८ मधील गंगानगर परिसरात सुरू असलेल्या भूमिगत गटर योजनेच्या कामात काही नागरिकांनी थेट हस्तक्षेप करत सांडपाणी सोडल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. योजना अद्याप पूर्णपणे कार्यान्वितही झालेली नसताना चेंबरमध्ये सांडपाण्याच्या पाइपलाइन जोडल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

गंगानगर भागातील प्रभाग क्रमांक 8 मधील प्रकार : कारवाई करण्याची नागरिकांची मागणी
अकोला : शहरातील प्रभाग क्रमांक ८ मधील गंगानगर परिसरात सुरू असलेल्या भूमिगत गटर योजनेच्या कामात काही नागरिकांनी थेट हस्तक्षेप करत सांडपाणी सोडल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. योजना अद्याप पूर्णपणे कार्यान्वितही झालेली नसताना चेंबरमध्ये सांडपाण्याच्या पाइपलाइन जोडल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
गंगानगरमधील मॉर्डन इंग्लिश स्कूलकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर असलेल्या जमजम स्टोअर गल्लीतील काही नागरिकांनी महानगरपालिकेची कोणतीही परवानगी न घेता भूमिगत गटर योजनेच्या चेंबरमध्ये स्वतःच्या घरातील सांडपाण्याच्या पाइप टाकल्याचे उघड झाले आहे. या गल्लीत काही नागरिकांनी हा प्रकार केल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
यामुळे अद्याप पूर्णत्वास न गेलेल्या गटार योजनेच्या पाइपलाइनमध्ये सांडपाणी सोडले जात असून योजना सुरू होण्यापूर्वीच ती अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्थानिकांच्या मते, संबंधित नागरिकांनी घरासमोर तात्पुरता शोषखड्डा तयार करून सांडपाण्याची व्यवस्था करणे अपेक्षित होते. मात्र तसे न करता थेट सुरू असलेल्या शासकीय कामातच खोडा टाकल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
परिसरातील नागरिकांनी सांगितले की, महानगरपालिकेचे या कामाकडे दुर्लक्ष होत असल्याने काही जणांनी त्याचा गैरफायदा घेत गटार चेंबरमध्येच सांडपाणी सोडले. त्यामुळे संपूर्ण योजनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणात संबंधित नागरिकांना तात्काळ सांडपाण्याच्या पाइपलाइन काढण्याचे आदेश देऊन दंडात्मक कारवाई करावी, तसेच शोषखड्डे करण्याबाबत सक्तीचे निर्देश द्यावेत, अशी मागणी गंगानगर व जमजम स्टोअर गल्लीतील नागरिकांनी केली आहे.
संबंधितांवर कठोर कारवाई केल्यास इतर नागरिकही अशा प्रकारची मनमानी करण्यापासून परावृत्त होतील आणि शासकीय कामात अडथळे निर्माण होणार नाहीत, असे मतही नागरिकांनी व्यक्त केले आहे. त्यामुळे महानगरपालिकेने तातडीने कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.

