Electricity bills : अकोला परिमंडळाअंतर्गत महावितरणने वीजबिल थकबाकीदारांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली असून, वीजबिल भरणार नाही तर वीजही मिळणार नाही, अशी कठोर भूमिका घेत अकोला, बुलढाणा व वाशिम जिल्ह्यातील एकूण ६,३८७ ग्राहकांचा वीजपुरवठा जानेवारी महिन्यात खंडित करण्यात आला आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील ४,३५२ ग्राहकांचा समावेश असून, त्यांना महावितरणच्या कारवाईचा मोठा फटका बसला आहे.

अकोला परिमंडळात ६,३८७ थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित; २३३ कोटींची थकबाकी कायम
बुलढाणा : अकोला परिमंडळाअंतर्गत महावितरणने वीजबिल थकबाकीदारांविरुद्ध धडक मोहीम सुरू केली असून, वीजबिल भरणार नाही तर वीजही मिळणार नाही, अशी कठोर भूमिका घेत अकोला, बुलढाणा व वाशिम जिल्ह्यातील एकूण ६,३८७ ग्राहकांचा वीजपुरवठा जानेवारी महिन्यात खंडित करण्यात आला आहे. यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील ४,३५२ ग्राहकांचा समावेश असून, त्यांना महावितरणच्या कारवाईचा मोठा फटका बसला आहे.
अकोला परिमंडळात वीजबिलांच्या प्रचंड थकबाकीमुळे महावितरणसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अकोला, बुलढाणा व वाशिम या तीन जिल्ह्यांतील लघुदाब वर्गवारीतील (घरगुती, व्यावसायिक, औद्योगिक व इतर) एकूण ११ लाख ६७ हजार १८२ ग्राहकांकडे जानेवारी महिन्याचे चालू बिल वगळता तब्बल ३४५ कोटी रुपयांची थकबाकी होती. यापैकी जानेवारी महिन्यात ११२ कोटी रुपयांची वसुली करण्यात आली असली, तरी अद्याप २३३ कोटी रुपयांची थकबाकी प्रलंबित आहे.
अकोला जिल्ह्यात ४,१६,३३७ ग्राहकांकडे १२६ कोटी ६३ लाख रुपये थकबाकी; वसुली ४६ कोटी ४५ लाख रुपये झाली आहे तर बुलढाणा जिल्हा : ५,२९,६८२ ग्राहकांकडे १५९ कोटी ७२ लाख रुपये थकबाकी; वसुली ४६ कोटी ३१ लाख रुपये वसुल झाले आहे. तसेच वाशिम जिल्हा : २,२१,१६३ ग्राहकांकडे ५८ कोटी ७९ लाख रुपये थकबाकी; वसुली केवळ १८ कोटी ९५ लाख रुपये वसूल झाले आहेत.
वारंवार आवाहन करूनही अनेक ग्राहकांनी वीजबिल न भरल्याने थकबाकीचा आकडा दिवसेंदिवस वाढत असल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे आता महावितरणने थकबाकीदारांची वीजजोडणी थेट खंडित करण्याची कठोर मोहीम हाती घेतली आहे.
जानेवारी महिन्यात अकोला जिल्ह्यात १,३२१, बुलढाणा जिल्ह्यात ४,३५२ आणि वाशिम जिल्ह्यात ७१४ ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.महावितरणची ही कारवाई टाळण्यासाठी थकबाकीदार ग्राहकांनी तात्काळ वीजबिल भरून सहकार्य करावे, असे आवाहन मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी केले आहे.

