Mahabreaking

[breaking_news]

Sama Maharaj Daundkar :आई-वडिलांच्या वाटणीसाठी त्यांची अवहेलना करू नका : समा महाराज दौंडकर यांचे परखड प्रबोधन

Sama Maharaj Daundkar : भगवंताने माणसाला ज्ञान व इंद्रिये दिली आहेत, मग गर्व कशाला करायचा? प्रपंच करत असताना परमार्थ केला तरच जीवन पूर्णत्वास जाते. आई-वडिलांच्या वाटणीसाठी त्यांची अवहेलना करू नका, त्यांनी जसे आपल्याला सांभाळले तसेच त्यांनाही सांभाळा, असा मौलिक संदेश तृतीय पंथीय किर्तनकार ह.भ.प. समा महाराज दौंडकर यांनी सवडद येथील गणेश जयंती महोत्सवात दिला.

Sama Maharaj Daundkar

महाप्रसाद वितरणाने गणेश जयंती महोत्सवाची सांगता

साखरखेर्डा : भगवंताने माणसाला ज्ञान व इंद्रिये दिली आहेत, मग गर्व कशाला करायचा? प्रपंच करत असताना परमार्थ केला तरच जीवन पूर्णत्वास जाते. आई-वडिलांच्या वाटणीसाठी त्यांची अवहेलना करू नका, त्यांनी जसे आपल्याला सांभाळले तसेच त्यांनाही सांभाळा, असा मौलिक संदेश तृतीय पंथीय किर्तनकार ह.भ.प. समा महाराज दौंडकर यांनी सवडद येथील गणेश जयंती महोत्सवात दिला.

सवडद येथे श्री गणेश जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. दि. २१ जानेवारी रोजी रात्री समा महाराज दौंडकर यांच्या किर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले. त्यापूर्वी त्यांच्या डी.जे.सह मिरवणुकीने परिसर दुमदुमून गेला. त्यानंतर संत तुकाराम महाराजांच्या “लागोनिया पाया विनवितो तुम्हाला” या अभंगावर आधारित प्रभावी किर्तन सादर करण्यात आले.

किर्तनात बोलताना समा महाराज म्हणाल्या, “आम्ही तृतीय पंथीय आहोत हे आम्ही नाकारत नाही; पण समाज आम्हाला का नाकारतो, हे कळत नाही. आम्हाला प्रपंच करण्याचा अधिकार नसला तरी परमार्थ करण्याचा हक्क कोणी हिरावून घेऊ शकत नाही. आमच्यातील गुण-दोष हेही परमेश्वरानेच निर्माण केले आहेत, कारण या विश्वाचा निर्माता तोच आहे.”

“टोलनाक्यावर किंवा बाजारात आम्ही टाळी वाजवून दहा रुपये मागितले तर द्या, नाही दिले तरी चालेल; मात्र तृतीय पंथीयांची अवहेलना करू नका. ‘तो जेवला का? कसा आहेस?’ एवढी आपुलकी दाखवा, मायेने दिलेला आशीर्वाद नक्कीच लाभेल,” असे भावनिक आवाहन त्यांनी केले. आपण पत्रकार असून तृतीय पंथीयांच्या हक्कांसाठी शासनासोबत लढत राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महोत्सवाअंतर्गत दि. २० जानेवारी रोजी सकाळी ह.भ.प. अशोक महाराज घायाळ यांनी तीन दिवसांचे गणेश पुराण कथाकथन केले. दुपारी मोफत वैद्यकीय व नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले. पोलीस उपनिरीक्षक गणेश डोईफोडे यांचे कायदा व सुव्यवस्था विषयावर व्याख्यान, दि. २१ जानेवारी रोजी सेवानिवृत्त केंद्रप्रमुख दिलीप खंदारे यांचे विद्यार्थ्यांचे कर्तव्य या विषयावर व्याख्यान झाले. तसेच पलसिद्ध महास्वामी मठाचे मठाधिपती सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज यांचे प्रवचन संपन्न झाले.दि. २२ जानेवारी रोजी भरत महाराज जाधव यांच्या काल्याच्या कीर्तन सेवेने कार्यक्रमाची सांगता झाली. यानंतर नेत्र तपासणी शिबिरातील ५० गरजूंना डॉ. भाग्यश्री श्रीनिवास खेडेकर यांच्या वतीने चष्म्यांचे वाटप करण्यात आले.

यावेळी श्रीनिवास खेडेकर, युवासेना नेते योगेश जाधव, माजी सरपंच महेंद्र पाटील, माजी सभापती तेजराव देशमुख, माजी समाजकल्याण सभापती बाबूराव मोरे, युवासेना तालुका प्रमुख संदीप मगर, माजी प्राचार्य डी. एन. पांचाळ, सरपंच गजानन देशमुख यांच्यासह सामाजिक-राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन पत्रकार सचिन खंडारे यांनी केले. संतोष गाडेकर व ग्रामस्थांनी उत्सवाचे आयोजन केले होते. अखेरीस मान्यवरांच्या हस्ते महाप्रसाद वितरण करण्यात आले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top