Mahabreaking

[breaking_news]

A major accident was averted :मोठा अपघात टळला; एसटी बसचे ब्रेक फेल झाल्याने रस्त्याखाली शेतात उतरली, ३० प्रवासी बचावले

A major accident was averted : ब्रेक फेल झाल्याने एसटी बस थेट रस्त्याच्या खाली उतरून शेतात शिरली. ही घटना बुलढाणा–धाड मार्गावर गुरुवारी सायंकाळी घडली. सुदैवाने या अपघातात बसमधील सुमारे ३० प्रवासी सुखरूप असून कोणतीही जीवितहानी झाली नाही.या अपघानंतर भंगार बसेसचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

A major accident was averted
बुलढाणा ते धाड मार्गावर घडला अपघात; भंगार बसेसमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात

पंडीत सावळे 
मासरूळ : ब्रेक फेल झाल्याने एसटी बस थेट रस्त्याच्या खाली उतरून शेतात शिरली. ही घटना बुलढाणा–धाड मार्गावर गुरुवारी सायंकाळी घडली. सुदैवाने या अपघातात बसमधील सुमारे ३० प्रवासी सुखरूप असून कोणतीही जीवितहानी झाली नाही.या अपघानंतर भंगार बसेसचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.
वरुड–सोयगाव–जामठी मार्गावर धावणारी बस क्रमांक MH 20 BL 1806 हिचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे, ही बस अनियंत्रीत होवून रस्त्याच्या खाली उतरून शेतात शिरली. ही थरारक घटना गुरुवारी सायंकाळी साडेपाच वाजताच्या सुमारास शरद पवार विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, वरुड (धाड–बुलढाणा मार्ग) परिसरात घडली. बस धाडहून बुलढाण्याकडे जात असताना अचानक मोठा आवाज झाला. टायर फुटल्यासारखा आवाज येताच ब्रेक पाइप फुटल्याने बसचे ब्रेक निकामी झाल्याचे चालक एन. आर. शिपने यांच्या लक्षात आले.
चालकाने प्रसंगावधान राखत गिअर बदलून बसचा वेग कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र रस्त्याच्या दोन्ही बाजूला घरे, नागरिक व वाहने असल्याने बस डावीकडे किंवा उजवीकडे वळवणे शक्य नव्हते. अखेर जीवितहानी टाळण्यासाठी चालकाने समोर असलेल्या गजानन माघाडे यांच्या घराजवळील इलेक्ट्रिक पोलच्या ताणाला धडक दिली. त्यानंतर बस रस्त्याच्या उजव्या बाजूला डोंगरे यांच्या शेतात कडब्याच्या गंजीवर जाऊन थांबली. या अपघातात बसखाली आलेल्या दुचाकीस्वाराचाही जीव थोडक्यात वाचला. प्रसंगावधान दाखवत स्थानिक नागरिकांनी धाव घेऊन दुचाकीस्वाराला बाहेर काढले. तो सुखरूप असल्याचे समजताच सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
बस ब्रेक फेल झाल्याने पुढे पुढे जातच असल्याचे पाहून परिसरातील नागरिकांनी आरडाओरड करून चालकाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. मात्र काही काळ नागरिकांनाही ब्रेक फेल झाल्याचे लक्षात आले नव्हते.
घटनेची माहिती मिळताच ठाणेदार प्रताप भोस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. केंद्रे साहेब व पोलीस कॉन्स्टेबल माळी यांनी पंचनामा करून पुढील कारवाई केली. यावेळी वरुड–सोयगाव परिसरातील पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच तसेच मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या घटनेमुळे काही काळ परिसरात एकच खळबळ उडाली होती. चालकाच्या सतर्कतेमुळे आणि नागरिकांच्या मदतीमुळे मोठा अनर्थ टळला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top