Mahabreaking

[breaking_news]

Samruddhi Expressway :समृद्धी महामार्गालगतच विनापरवाना गौण खनिज उत्खनन; महसूल प्रशासनाने केला पंचनामा

Samruddhi Expressway : समृद्धी महामार्गालगत सुरू असलेल्या बेकायदेशीर गौण खनिज उत्खननाचा प्रकार अखेर उघडकीस आला असून, लोणार तालुक्यातील मांडवा शिवारात महसूल प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. समृद्धी महामार्गावरील पेट्रोल पंप परिसरात सुरू असलेल्या हॉटेल व रेस्टॉरंटच्या बांधकामासाठी विनापरवाना मुरूम उत्खनन केल्याप्रकरणी ग्राम महसूल अधिकारी सचिन एल. खिल्लारे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.

Samruddhi Expressway

रमेश खंडागळे

बीबी : समृद्धी महामार्गालगत सुरू असलेल्या बेकायदेशीर गौण खनिज उत्खननाचा प्रकार अखेर उघडकीस आला असून, लोणार तालुक्यातील मांडवा शिवारात महसूल प्रशासनाने मोठी कारवाई केली आहे. समृद्धी महामार्गावरील पेट्रोल पंप परिसरात सुरू असलेल्या हॉटेल व रेस्टॉरंटच्या बांधकामासाठी विनापरवाना मुरूम उत्खनन केल्याप्रकरणी ग्राम महसूल अधिकारी सचिन एल. खिल्लारे यांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आहे.

मांडवा गावाजवळून गेलेल्या समृद्धी महामार्गावर, नागपूरकडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गालगत सर्व्हिस रोडच्या बाजूला एमएमआरडीए हद्दीतील सुमारे ४ हेक्टर ४९ आर जमीन विकासासाठी अधिग्रहित करण्यात आलेली आहे. या परिसरात पेट्रोल पंपासह अनेक लहान-मोठी हॉटेल्स सुरू असून, सध्या दोन हॉटेल्सचे टिन शेड उभारणीचे काम सुरू असल्याचे आढळून आले. या कामासाठी सुमारे ६० ब्रास मुरूमाचे उत्खनन करून त्याचा थेट वापर करण्यात आल्याचे पंचनाम्यात नमूद आहे.

विशेष म्हणजे हे उत्खनन १९ जानेवारी रोजी सायंकाळी ७ वाजल्यापासून २० जानेवारीच्या पहाटे ३ वाजेपर्यंत, म्हणजेच रात्रीच्या अंधारात नियम डावलून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सदरील जमीन नागपूर येथील निसार अहमद सिद्दिकी या व्यक्तीस ६० वर्षांच्या लीजवर देण्यात आल्याची माहिती असून, ही जमीन पुढे विविध व्यावसायिकांना हॉटेल, रेस्टॉरंट व अन्य वापरासाठी मोठ्या रकमेवर भाड्याने दिली जात असल्याची चर्चा परिसरात सुरू आहे.

कारवाईदरम्यान कामाची देखरेख करणाऱ्या स्थानिक सुपरवायझरकडे मुरूमाचा सुपूर्दनामा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र त्याने आधी सिद्दिकी यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधून नंतर सुपूर्दनाम्यावर सही करण्यास नकार दिल्याने प्रकरण अधिक संशयास्पद ठरले आहे. या संपूर्ण कारवाईचे प्रतिवेदन ग्राम महसूल अधिकारी श्री. सचिन खिल्लारे यांनी तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी लोणार श्री. भूषण पाटील यांच्याकडे सादर केले आहे.

ही पंचनाम्याची कार्यवाही ग्राम महसूल अधिकारी सचिन खिल्लारे, दादाराव साळवे, महसूल सेवक विलास गायकवाड, मच्छिंद्र जगदाळे तसेच पंच सुधाकर डोंगरदिवे व रमेश खंडागळे यांच्या उपस्थितीत करण्यात आली.

दरम्यान, समृद्धी महामार्गासारख्या महत्त्वाच्या प्रकल्पालगत सुरू असलेल्या या बेकायदेशीर उत्खननावर प्रशासन किती दंड आकारते आणि दोषींवर कोणती ठोस कारवाई करते, याकडे परिसरातील नागरिकांसह राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे. “कारवाई फक्त पंचनाम्यापुरतीच मर्यादित राहणार की मोठ्या मास्यांवरही हात पडणार?” असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.

 

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
Scroll to Top