Deulgaon Raja Municipal Council : देऊळगाव राजा नगरपालिकेतील विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडीत महायुतीचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले. आमदार मनोज कायंदे यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेतील सत्ताकारणात समतोल राखत महायुतीने विरोधी उबाठा गटालाही सत्तेत स्थान दिले असून, उबाठाच्या पाठिंब्यामुळे एका नगरसेवकाची विषय समितीच्या सभापतीपदी निवड झाली आहे. यामुळे पालिकेच्या राजकारणात महायुतीची रणनीती आणि व्यापक राजकीय समन्वय स्पष्ट झाला आहे.

गजानन तिडके
देऊळगाव राजा : देऊळगाव राजा नगरपालिकेतील विषय समित्यांच्या सभापतींच्या निवडीत महायुतीचे वर्चस्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले. आमदार मनोज कायंदे यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिकेतील सत्ताकारणात समतोल राखत महायुतीने विरोधी उबाठा गटालाही सत्तेत स्थान दिले असून, उबाठाच्या पाठिंब्यामुळे एका नगरसेवकाची विषय समितीच्या सभापतीपदी निवड झाली आहे. यामुळे पालिकेच्या राजकारणात महायुतीची रणनीती आणि व्यापक राजकीय समन्वय स्पष्ट झाला आहे.
सविस्तर वृत्त असे की, देऊळगाव राजा नगरपालिका निवडणूक अंतिम टप्प्यात असताना न्यायालयीन प्रक्रियेमुळे काही काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती. या कालावधीचा फायदा काही उमेदवारांना झाला, तर काहींना पराभव स्वीकारावा लागला. अत्यंत चुरशीच्या या लढतीत महायुतीच्या माधुरी शिपने यांनी नगराध्यक्षपदाचा विजय मिळविला. यापूर्वीच उपाध्यक्षपदी सौ. वनिता भुतडा यांची निवड झाली होती.
आज झालेल्या विषय समितींच्या निवडणुकीत सभेच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा माधुरी शिपने होत्या तर पिठासीन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी, तर नगरपालिका मुख्याधिकारी अरुण मोकळ यांनी प्रशासकीय कामकाज पाहिले. पालिकेतील एकूण २१ सदस्यांपैकी महायुतीचे १२ नगरसेवक निवडून आले आहेत. यात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) ९ व भाजपाचे ३ नगरसेवक आहेत. उबाठा गटाचे दोन नगरसेवक महायुतीला पाठिंबा दिल्याने महायुतीची संख्या १४ वर पोहोचली आहे. तर माजी आमदार शशिकांत खेडेकर व माजी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या नगर विकास आघाडीचे ७ नगरसेवक आहेत.
विषय समित्यांच्या निवडीत सार्वजनिक बांधकाम समितीच्या सभापतीपदी विष्णू झोरे, स्वच्छता व आरोग्य समितीच्या सभापतीपदी संदीप शिंदे, शिक्षण समितीच्या सभापतीपदी शेख नमी राबी अतिक यांची निवड झाली. महिला व बालकल्याण समितीच्या सभापतीपदी सौ. वैशाली विकास कासारे, तर उपसभापतीपदी सौ. रुकसाना नजीर खान यांची निवड करण्यात आली.
स्थायी समितीच्या सभापतीपदी नगराध्यक्ष माधुरी शिपने यांची निवड झाली असून, सदस्य म्हणून उपाध्यक्ष सौ. वनिता भुतडा, विष्णू झोरे, संदीप शिंदे, वैशाली कासारे, शेख नमी राबी अतिक व राजेंद्र खांडेभराड यांची निवड झाली आहे.
या प्रसंगी महायुतीचे गटनेते प्रदीप वाघ, नगर विकास आघाडीच्या गटनेत्या सौ. रंजना रामाने यांच्यासह सर्व नगरसेवक उपस्थित होते. नवनियुक्त सभापतींचे आमदार मनोज कायंदे यांनी अभिनंदन करून भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. महायुतीने सत्तेचा समतोल राखत सर्व घटकांना सोबत घेण्याचा प्रयत्न केल्याने देऊळगाव राजा नगरपालिकेतील राजकीय समीकरणे अधिक भक्कम झाल्याचे चित्र आहे.

