Employee assaulted : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात शासकीय कामकाज सुरू असताना एका व्यक्तीने कर्मचाऱ्याशी वाद घालत शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना २३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.२० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत कर्मचाऱ्याच्या शर्टाची कॉलर पकडून मानेवर व चेहऱ्यावर चापटाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करण्यात आल्याची तक्रार देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

नोकरी गेल्याचा राग मनात धरून शिवीगाळ व मारहाण केल्याचा आरोप; देऊळगाव राजा पोलिसांत गुन्हा दाखल
गजानन तिडके
देऊळगाव राजा : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात शासकीय कामकाज सुरू असताना एका व्यक्तीने कर्मचाऱ्याशी वाद घालत शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना २३ नोव्हेंबर रोजी दुपारी १२.२० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेत कर्मचाऱ्याच्या शर्टाची कॉलर पकडून मानेवर व चेहऱ्यावर चापटाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. तसेच शासकीय कामकाजात अडथळा निर्माण करण्यात आल्याची तक्रार देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.

या प्रकरणी किशोर सिताराम म्हस्के (वय ५६, व्यवसाय नोकरी, रा. चिखली, ता. चिखली, जि. बुलढाणा) यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, गणेश सिताराम म्हस्के (रा. गिरोली खुर्द, ता. देऊळगाव राजा) हा २३ नोव्हेंबर रोजी दुपारी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयात आला. त्यावेळी किशोर म्हस्के हे कार्यालयात आपले शासकीय कामकाज करीत होते.
यावेळी आरोपी गणेश म्हस्के याने, ‘माझी कृषी उत्पन्न बाजार समितीतील नोकरी तुमच्यामुळे गेली,’ असे म्हणत फिर्यादीशी वाद घालण्यास सुरुवात केली. तसेच त्यांना शिवीगाळ केली. त्यावर फिर्यादीने त्याला शिवीगाळ करू नकोस, तू दारू प्यायलेला आहेस, घरी जा, असे सांगितले. मात्र, यामुळे वाद आणखी वाढला. आरोपीने फिर्यादीच्या शर्टाची कॉलर पकडून त्यांच्या मानेवर व चेहऱ्यावर चापटाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी फिर्यादी शासकीय काम करीत असताना त्यांच्या कामात अडथळा निर्माण करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे.
या घटनेप्रकरणी किशोर म्हस्के यांच्या फिर्यादीवरून देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात २३ नोव्हेंबर रोजी दुपारी ३.५६ वाजता गणेश सिताराम म्हस्के याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १३२, १२१ (१), ३५२, ३५१ (२) व ३५१ (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक राजकुमार मोहोळकर करीत आहेत. शासकीय कार्यालयातच कर्मचाऱ्याला मारहाण करून कामकाजात अडथळा निर्माण झाल्याने या घटनेची परिसरात चर्चा सुरू आहे.

