A Electrick motor : तालुक्यातील सावखेड भोई शिवारात शेतातील विहिरीत बसविलेली तीन एचपी क्षमतेची टेक्समो कंपनीची विद्युत मोटार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या मोटारीची किंमत १६ हजार ८०० रुपये असून, या चोरीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सेवानिवृत्त शिक्षकाला चोरट्यांचा फटका; तीन एचपीची टेक्समो कंपनीची मोटार लंपास
गजानन तिडके
देऊळगाव राजा : तालुक्यातील सावखेड भोई शिवारात शेतातील विहिरीत बसविलेली तीन एचपी क्षमतेची टेक्समो कंपनीची विद्युत मोटार अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. या मोटारीची किंमत १६ हजार ८०० रुपये असून, या चोरीमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. याप्रकरणी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समाधान सोनाजी जाधव (वय ६१, व्यवसाय सेवानिवृत्त शिक्षक, रा. सावखेड भोई, ता. देऊळगाव राजा) यांची सावखेड भोई शिवारातील गट क्रमांक ३१९ मध्ये शेती आहे. त्यांच्या शेतातील विहिरीमध्ये पाणी उपसा करण्यासाठी टेक्समो कंपनीची तीन एचपी क्षमतेची विद्युत मोटार बसविण्यात आली होती.
२१ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजेपासून ते २२ नोव्हेंबर रोजी सकाळी ९ वाजेदरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्याने संधी साधून विहिरीतील ही मोटार चोरून नेली. समाधान जाधव यांच्या निदर्शनास मोटार चोरीला गेल्याचे आल्यानंतर त्यांनी परिसरात शोध घेतला; मात्र मोटार मिळून आली नाही.अखेर त्यांनी २४ नोव्हेंबर रोजी देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३०३ (२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल संजय गोरे करीत आहेत. शेतातील विहिरींमधील विद्युत मोटारी चोरीला जाण्याच्या घटनांमुळे शेतकऱ्यांच्या शेतीकामावर परिणाम होण्याची शक्यता असून, अशा चोऱ्यांना आळा घालण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून होत आहे.

